पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुले भिंतीवरील स्थिर अंकाच्या घड्याळापेक्षा मनगटावरील त्यांच्या अंकीय घड्याळाद्वारे लवकर वेळ मोजायला, जाणायला शिकतात. तीच गोष्ट त्यांच्या कार्टून फिल्म्स्, व्हिडिओ गेम्सची. आभासी खेळ (Virtual Games) आता त्यांना मोहिनी घालत आहे. हे सारे जग त्यांना डाऊनलोड, डिलीट, कट, पेस्ट, सेंड, कॉपी, फॉरवर्ड, शुट, स्नॅप, शॉट, स्टॉप, गो, विन, स्टार्ट, रिस्टार्ट, शट डाऊन या साऱ्या अंकीय क्रिया, प्रतिक्रिया आपोआपच शिकवते. शिक्षकास मात्र हे सारे प्रयत्नपूर्वक शिकावे लागत आहे. ही वस्तुस्थिती आहे. अंकीय साधने नव्या पिढीचा चाळा होत असताना शिक्षकास ती कुशलता मात्र अर्जुन आणि एकलव्याच्या एकाग्रतेने मिळवावी लागेल आणि आता त्याला पर्याय राहिला नाही. अंकीय साक्षरतेचे चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे परिणाम दिसून येतात. असे परिणाम, गुण-दोष सार्वकालिक असतात. पूर्वी होते आणि ते आताही राहणार. प्रश्न आहे शिक्षण अधिक प्रभावी व परिणामकारक करण्याचा. तुम्ही जितकी प्रगत साधने व तंत्रज्ञान वापराल तितके तुमचे शिकवणे/शिकविणे प्रगत होत राहील. नव्या पिढीचा अल्पकालिक एकाग्रता, चंचलता, दृश्य माध्यमांचा वाढता प्रभाव व आकर्षण व्यक्तिगततेचे विसर्जन (मुलांचे एकछाप होणे) समाज वास्तवापासून त्यांचे दुर जाणं नि राहणे, खासगीपणा संपणे, नैराश्य नि भयाचा वाढता अंमल हे सारे घेऊन येणारे आजचे विद्यार्थी हा नव्या शिक्षकापुढचा खरा प्रश्न नि आव्हान आहे. त्यास तोंड द्यायचे तर शिक्षकास आपल्या अंकीय साक्षरता व क्षमतांचा विकास करणे अटळ होऊन बसले आहे खरे ! अर्ध जग अंकीय निरक्षर असले, तरी अंकीय साक्षरता भूमितीच्या कपारीत राहात, जंगल, नद्या, नाले, डोंगर, दऱ्या तुडवत मोबाईल धारक झाल्याचे चित्र कोण नाकारेल? अंकीय साक्षरतेचा संबंध अज्ञान, दारिद्रयाशी फार जोडून त्याच्याशी फारकत घेऊन राहता येईल अशी परिस्थिती राहिलेली नाही. हे वास्तव नव्या काळच्या शिक्षकांनी स्वीकारून अनुरूप आपली अध्यापन कौशल्ये व क्षमता विकसित करायला हव्यात. अंकीय साक्षरतेचे फायदे अनेक, तशीच त्यांची इंटरनेटवर साधनंही विपुल आहेत. ही साधने बरीचशी दृक्/दृश्यमय व काही दृकश्राव्यही! एका चित्र दृश्यात हजार शब्दांचं सामर्थ्य असते हे आपण विसरून चालणार नाही. गती प्रत्ययकारी, ध्वनी लयबद्ध असतो. त्यांचा संयुक्त त्रिमितिक प्रभाव जो हजार तासांनी निर्माण होणे अशक्य, तो क्षणात सिद्ध करण्याची किमया अंकीय साधनात असते. त्यामुळे नवशिक्षकांनी अंकीय संसाधने आत्मसात करून आपली साक्षरता सिद्ध केली पाहिजे. उपलब्ध आहेत त्यांच्या साहाय्याने शिक्षक,

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१७८