पान:देशी हुन्नर.pdf/98

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ९२ ]

भार तांबें व  / भार कथील घेतात, व तास करण्याकरितां १० भार तांबे आणि  / भार कथील घेण्याची चाल आहे.

 पूणें, मुंबई, नरावी, कोसगड, मलावार, विजागापट्टण, तंजोर, जोधपूर, व इतर कांहीं ठिकाणीं लोखंडाचीं भांडीं होतात. तसेंच विलायती जस्ती पत्र्याचे डबे वगैरे पुष्कळ ठिकाणीं होऊं लागले आहेत.

 तांब्या पितळेची प्राचीन काळची भांडीं दृष्टीस पडणें फार कठीण आहे. कारण आपल्या देशांत जुनीं भांडीं कासारास परत देऊन नवी घेण्याची चाल आहे, त्यामुळें जुनामाल कोठें शिल्लक रहात नाहीं. हल्लीं हिंदुस्थानांतील जुन्यांत जुना गडवा विलायतेंतील एका सर्व संग्रहालयांत आहे. त्याजविषयीं खालीं लिहिलेलें वर्णन सरजाज बर्डउड साहेबांच्या पुस्तकांतून घेतलें आहे.
 "हा गडवा कुलु प्रांतीं कुंडला गांवीं इ. स. १८५७ सालीं मेजर हे साहेबांस सांपडला. डोंगराच्या एका बाजूची माती सुटून कोसळून पडली त्यामुळे तींत सुमारें सोळाशें वर्षें पुर्वीचें पुरून राहिलेलें एक लेणें सांपडले. त्यांत हा ' लोटा' होता. हा गडवा वाटोळा गरगरीत असून बैठकीजवळ थोडा थबकट आहे. व त्याचा गळा रामपात्रासारखा आहे. त्याजवर चित्रें खोदून काढिलेलीं आहेत, त्यांत गौतमबद्ध वैराग्य धारण करण्यापूर्वी राजपुत्र सिद्धार्थ या नावानें प्रसिद्ध होता त्या वेळीं निघालेल्या त्याच्या स्वारीचें चित्र आहे. त्यांत पहिल्यानें हत्तीवर बसून एक मोठा सरदार चालला आहे, त्याच्या मागें दोघी नायकिणी आहेत, त्यांत एकीच्या हातांत विणा आहे, व दुसरीच्या हातांत मुरली आहे. त्याच्या मागें चार घोडयाच्या रथांत बसून राजपुत्र सिद्धार्थ चालला आहे. व सर्वांच्या मागें दोन घोडेस्वार हातांत भाले घेऊन चालले आहेत. या सर्व चित्राचा रोंख ऐहिक विषयाच्या उपभोगाची व ऐषआरामाची प्रत्यक्ष साक्ष देण्याकडे आहे. "

 चांदीचा व सोन्याचा मुलामा देण्याचें काम कोठें कोठें होत असतें, त्यांत काश्मीर, दिल्ली व आग्रा येथील कामाची विशेष ख्याती आहे. लखनौ व रामपूर येथेंही पानसुपारीच्या डब्यांवर व तबकांवर मुलामा देण्याचें काम चांगलें होतें. विलायती तऱ्हेनें ह्मणजे विद्युल्लतेच्या मदतीनें सोन्यारुप्याचें पाणी चढविण्याचें काम हल्ली चहूंकडे होऊं लागलें आहे. त्यांत मुंबई, दिल्ली, लाहोर, अमृतसर व जयपूर या गावांचें पाऊल पुढें आहे. पुणें शहरांत मात्र या कामाची एक दोन तरी दुकानें बुधवारांत दृष्टीस पडण्याचा प्रसंग केव्हां येईल तो येवो.