पान:देशी हुन्नर.pdf/96

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ९० ]

 धोलपूर येथेंही नक्षीचे हुके तयार करितात.

 जोधपूरच्या लोटण दिव्याची प्रसिद्धी आहे. वाटोळा पिंजऱ्यासारखा दिवा करून त्यांत फिरत्या दांडीवर एक दौतीसारखें दिवठण बसवून, त्यांत शिसें ओतलेलें असतें. त्यामुळें दिवा जमिनीवर गडबडां लोटला तरी दिवठणाचें तोंड वरतीच रहातें व दिवा विझत नाहीं. हल्लीं असले दिवे बडोदें, जयपूर व इतर पुष्कळ ठिकाणीं होऊं लागले आहेत. मारवाड प्रांतींही मागें वर्णन केलेली 'कटोरादान' नांवाची पेटी, व 'तिरोंची' नांवाची एक तिवई ह्या तयार होतात. तसेंच नगर गांवीं जवाहीर वजन करण्याचा कांटा तयार करितात. हा कांटा धारवाडी कांट्याप्रमाणें पुष्कळ प्रसिद्ध आहे.

 टोंक येथे चांगली अत्तरदाणी पूर्वी होत असे असें ह्मणतात.

 मध्य हिंदुस्थानांत तिहरी, उज्जयिनी, इंदोर, रतलाम, छत्रपूर, दात्या, रेवा व चर्खारी या गांवचीं भांडीं प्रसिद्ध आहेत. तिहरी येथें हत्ती, घोडे, व इतर जनावरांचीं चित्रें फार चांगलीं तयार होतात. उज्जयिनीस कांशाचे लोटे व चमत्कारिक देवाच्या मूर्ति तयार होतात. इंदोरचीं उपकरणीं, रतलामचें कणस, छत्रपूर व दात्या येथील दिवे व कुलुपें, ह्यांचीही प्रसिद्धी आहे. छत्रपुरास एका प्रकारचें कुलुप तयार करितात त्यांत दोन बारी पिस्तूल असतें. त्यामुळें तें उघडतांना मोठा अवाज होऊन रक्षक सावध होतो. छत्रपूर व रेवा येथें खोटे दागिने होतात. चर्खारी येथे पितळेचीं बुद्धिबळें होतात.

 मद्रास इलाख्यांत पितळेची व काशाची भांडी पुष्कळ ठिकाणीं होतात. बेलारी, करजगड, मलाबार, व विजागापटण हें गांव कांशाच्या भांड्यांकरितां प्रसिद्ध आहेत. अनंतपूर, बलारी, सालेम, मद्रास, मदूरा, मलाबार, गोदावरी, कडाप्पा, विजागापटण व तंजोर या गांवीं पितळेचीं भांडीं होतात. तिरूपट्टी या गांवचीं तबकें फार प्रसिद्ध आहेत. 'घासलेट' चें तेल निघाल्या पासून पितळेच्या समया पूर्वीपेक्षां फार कमी निघूं लागल्या असें मागें सांगितलेंच आहे. मदुरा जिल्ह्यांत 'तिरुपतूर ' व मदूरा या गांवीं, व कृष्णा या गांवीं, पितळेच्या भांड्यावर नक्षीचें काम होतें. स्वयंपाकाची भांडी कृष्णा, सालेम, मद्रास, मदुरा, मलबार गोदावरी, कडाप्पा, विजागापट्टण व तंजोर या सर्व गांवीं होतात कथलाच्या भांडयाबद्दल सालेम, विजागापट्टण व तंजोर या गांवाची प्रसिद्धी आहे सालेम व तंजोर येथें शिशाचीही भांडीं तयार होतात, बेलारीस चिनई ज-