पान:देशी हुन्नर.pdf/95

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ८९ ]

तिकडील धंदा बसण्यास मुंबई कारण आहे. व मुंबई शब्दांत पुण्याचा समावेश होतो अशी आमची समजूत आहे. इकडील माल मध्यप्रांतांत जाऊन तेथें सवंग विकला जातो, नागपूर व भंडारा गांवच्या कांहीं कासार लोकांस बनारस येथें होणाऱ्या नक्षीच्या भांड्यासारखीं भांडीं तयार करितां येतात.शिंदवाडा येथील डेप्युटी कमिशनर आपल्या रिपोर्टांत असें लिहितात कीं नागपुरास आगगाडी झाल्यापासून त्या जिल्ह्यांतील कासार लोकांच्या धंद्यास उतरती कळा लागली आहे. दाबोहा जिल्ह्यांत जकेरा गांवीं समया तयार होतात.
 जयपुरास झील दिलेलीं भांडीं चांगलीं होतात. परंतु त्यांत तेथील गुडगुड्याची हिंदुस्थानांत फार प्रसिद्धी आहे. अलीकडे डाक्तर हेन्डली साहेबांनीं नक्षीची भांडीं करण्याचा कारखाना काढिला आहे. जयपूरचे महाराज उदारमनाचे असल्यामुळें आपल्या राज्यांतील कलाकौशल्यांस उत्तेजन देण्याचें कामीं ते फार पैसा खर्च करत असतात. त्यामुळें इतर प्रांतांतील कांहीं कारागीर तिकडे जाऊन राहिले आहेत. तेथील हुन्नर शाळेंतही नक्षीचें पितळी काम पुष्कळ व चांगलें होतें. कलकत्ता येथील प्रदर्शनांत जयपूर येथील हुन्नर शाळेवरील मुख्याधिकाऱ्यांनीं नाशिक, बडोदें, व पुणें, येथील पुष्कळ भांडीं आमच्या देखत खरेदी केली तेव्हांच, जयपुरास असली भांडीं होऊं लागतील अशी आमची खात्री झाली. व त्याप्रमाणें तयार होऊन आलेलें नमुनें लंडन शहरांत आम्ही पाहिले ही. जयपुरास पुतळ्यांच्या हातांत दिलेले दिवे, देवपुजेची भांडीं, वगैरे पुष्कळ जिनसा तयार होतात.
 चिरोवा व 'झणझण ' गांवी जस्ताच्या सुरया व हुक्के तयार करून त्यांजवर पितळेची नक्षी तयार करीत असतात. तेथें घंटा व तास हीं तयार करीत असतात.
 बिकानेर येथें काशाच्या किंवा चिनी जस्ताच्या सुरया करून त्यांस पितळेचे तोटी सुद्धां पूड बसवितात. पितळेचे दागिने ठेवण्याचे " कटोरादान" यानांवानें प्रसिद्ध असलेले डबे ही तेथें पुष्कळ तयार होतात.
 जलंदर याप्रांती डाग या गांवीं पलंगाचे गातें चांगलें तयार होतात अशी कीर्ति आहे. रकाबी, पितळेच्या दौती, कलमदानें, गुलाबदाण्या, व गरीब लोकांकरितां तयार केलेले पितळेचे खोटे दागिने तयार होतात.
 करवली गांवीं लोटे व इतर भांडीं तयार होतातच. परंतु तेथील हुक्के विशेष प्रसिद्ध आहेत. कारण त्यांजवर पारा चढवून नंतर नक्षी खोदीत असतात.    १२