पान:देशी हुन्नर.pdf/94

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ८८ ]

'हॉटेलांत ' विलायतेस जाणारे पुष्कळ साहेब लोक उतरत असत. त्यानीं ही सोन्यासारखी चकचकणारी व रंगी बेरंगी लांखेच्या नक्षीनीं सुशोभीत केलेलीं सुंदर भांडीं पाहून ती खरेदी करण्याची सुरुवात केली. तेव्हांपासून मुरादाबादच्या भांडी करणारांस अकरावा गुरू आला आहे. ह्या कामाचे दोन प्रकार आहेत. एक साधा व एक सियाकलम. साध्या कामांत भांड्यांवर पहिल्यानें कल्हई करून नंतर नक्षी खोदून काढितात. त्यामुळें ती पांढऱ्या जमिनीवर पिंवळी दिसते. 'सियाकलम' कामांत भांडे घडून त्याच्यावर नक्षी करितात. व त्या नक्षीच्या खोचींत काळी लाख भरतात. आलीकडे तांबडी व हिरवी लाख भरूं लागले आहेत. पुणें येथील प्रदर्शनांत मुरादाबाद येथून पुष्कळ भांडीं आलीं आहेत. व तेथील एक महंमद यारखान नांवाचे व्यापारी येथें येऊन बसले आहेत.
 लखनौ शहरीं तबकें, पानपुडे, पानसुपारीचें डबे, गुलाबदाण्या, अत्तरदाण्या इत्यादि पुष्कळ भांडीं तयार होतात. तेथील जाळीच्या कामाची विशेष प्रसिद्धी अहि. बनारस, झांशी व ललितपूर येथें गंगाजमनी भांडीं पुष्कळ तयार होतात. गोरखपूर व मथुरा येथील समयांची प्रसिद्धी आहे. सुलतानपूर जिल्ह्यांतील हसनपूर गांव अझमगड जिल्ह्यांत उमलीपट्टी गांव यांची काशाच्या भांड्यांबद्दल कीर्ति आहे.

 मथूरेस देवाच्या मूर्ति पुष्कळ होतात, व तेथें यात्रेकरू फार जात असल्या कारणानें त्या विकतातही. हमीरपुरास पंच धातूच्या मोठाल्या मूर्ति तयार होत असतात.
 बंगाल्यांत मुर्शिदाबादेस खांग्रा ह्मणून एक गांव आहे तेथें, व दरभंगा शहराजवळ झंझारपूर ह्मणून एक गांव आहे तेथें, तसेंच कलकत्ता, कांचनगड, राजशाही कृष्णागंज, इसलामबाग बांसवेरिया व कटक या सर्व गांवीं भांडीं तयार होतात. पाटणा गांवीं एका प्रकारचें पितळेचें चहाचें भांडें तयार करीत असतात त्याला गिऱ्हाइकें फार आहेत असें म्हणतात.

 मध्यप्रांतांत शिंदवाडा जिल्ह्यांत भंडारा, लोधी खेडा, हुसंगाबाद जिल्ह्यांत तिमोरणी तसेच मंडला व संबळपूर या गांवीं पितळेचीं भांडीं तयार होत असत, परंतु गेल्या दहा वर्षांत तेथील कासार लोकांचा धंदा अगदीं बसत चालला आहे. फक्त भंडारा गांवीं दोनशे घराणीं हें काम करीत असत. परंत अलीकडे ती पन्नास साठच आहेत, या प्रांतांतील कामगारांचें असें ह्मणणे आहे कीं