पान:देशी हुन्नर.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ ३ ]

एकमेकांकडे ममतेने पाहताहेत व काही तोंडपुजेपणा करिताहेत ! ! ! त्यांचे हात मोठ्या खुबीने व गौरवाने हलताहेत; या चित्रातील फुलें आतांच उमललेली आहेत, पक्षी भरारी मारिताहेत, जनावरें कोठे उड्या मारीत आहेत, कोठे टकरा देत आहेत, व कोठें शांत मुद्रेनेंं आपल्या पाठीवरील ओझेंं वाहात आहेत !! " अशा रीतीने आनंदाच्या भरांत निमग्न असतांना मेहेरबान ग्रिफिथ्स साहेबांनी केलेले आमच्या लेण्याचे वर्णन पुराव्यांत दाखल करण्यास काही हरकत आहे असे कोणाच्याने तरी ह्मणवेल काय ? ही चित्रे उत्तम आहेत तथापि त्यांत कांहीं दोषही आहेत. इटली देशांतील चौथ्या शतकांतील चित्रकारांनी त्या देशांत जी चित्रे काढली आहेत त्यांच्या मनाचा त्या वेळचा कल आणि या अजंटा येथील चित्रकारांचा कल जुळता जुळतां बराच जुळला आहे. म्हणजे चित्ररेखन म्हणून जेंं “ शास्त्र" आहे त्याच्याकडे दुर्लक्ष, पुष्कळचित्रांची एका ठिकाणी गर्दी करण्याची तऱ्हा, आंतरिक्षयथादर्शन शास्त्राचा ( एरियल पर्स्पेक्टिव्हचा ) अभाव व कोणत्याही गोष्टीचे सुंदर चित्र काढण्याकडे लक्ष न देतां " खरोखर " चित्र काढण्याकडे विशेष लक्ष या सर्व तऱ्हा दोन्ही राष्ट्रांत सारख्याच आहेत.

 आपल्या देशांतील चित्रकला किंवा चित्ररेखनविद्या इतर कलांप्रमाणे व विद्येप्रमाणेच हल्ली अस्तास जाण्याच्या बेतांत आहे. ती यापूर्वीच अगदी नाहीशी झाली असती, परंतु मुसलमान सत्ताधीशांस ऐहिक सुखाचा उत्तम प्रकारे उपभोग घेण्याची संवय असल्यामुळे त्यांच्या धर्मात चित्रे काढू नये असा हुकूम असतांनाही त्यांनी ह्या कलेस पुष्कळ उत्तेजन दिले होतेंं असें प्रांजलपणें कबूल केले पाहिजे. अकबर बादशहाचे तर या कामांत आमच्या देशावर पुष्कळच उपकार आहेत. या बादशहाच्या दरबारी भोजराजाच्या नवरत्नांप्रमाणे सोळा उत्तम चित्रकार होते. त्यांनी महाभारताच्या फारशीभाषेत केलेल्या भाषांतरांत आमची पुराणाची चित्रे काढली आहेत. या भाषांतरास 'रजमनामा असे म्हणतात. हा 'रजमनामा' किंवा निदान त्याची नक्कल जयपुरच्या दरबारी हल्लींं आहे. तिच्यांत १६९ पाने चित्राने भरलेली आहेत. या ग्रंथाची किंमत चार लाख रुपये आहे असें ह्मणतात. या चित्रांबद्दल जयपूर येथील दरबारी 'सर्जन' डाक्तर हेन्डले असे म्हणतात की " ती फार उत्तम रीतीने काढलेली आहेत. ती पाहिली असतां फारशी देशांत चित्रकला किती पूर्णत्वास आली होती याचे चांगले अनुमान करता येते.