पान:देशी हुन्नर.pdf/82

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ७६ ]

रंगानें नक्षी काढावयाची व नंतर त्या नक्षीच्या भोंवतीं तांब्याचे किंवा सोन्याचे पत्रें बेगडासारखे चिकटावन नंतर भांडें भट्टींत घालावयाचे. भांडयावर नक्षी खोदून तिच्यांत मीना भरण्याचा जो प्रकार सांगितला त्या प्रकारांनीं तयार केलेलें काम व जपानी लोकांनीं तयार केलेले काम एक सारखेंच दिसतें ह्मणजे दोहींतही भांड्याची मूळ धातू मिन्यापेक्षां जास्ती उचलून दिसते.

 जयपूरगांवीं हरीसिंग अमरसिंग, किशनसिंग, घूमासिंग, शामसिंग, भिसासिंग, अंबासिंग, गोकूळ व हरसूकसिंग हें मिनागार प्रसिद्ध आहेत. त्यांत हरी सिंग व किसनसिंग याची गणनां चांगल्यांत केली आहे.

 जयपूरच्या खालोखाल मिन्याचें कामांत काश्मीरचा नंबर लागतो. अलीकडे जिकडे तिकडे प्रदर्शनें होत असल्यामुळें काश्मीरास मिन्याचें काम जास्ती जास्ती होऊं लागलें आहे. व मुंबई, कलकत्ता व इतर शहरीं काश्मीरी मिन्याचीं भांडी बाजारांत पाहिजे तेव्हां आयतीं विकत मिळतात त्यांत लोटे, ताटें, तबकें, तुंब्या, सुरया, गुलाबदाण्या, मेणबत्यांचीं घरें, फूलदानें, इत्यादि जिनसा मुख्य आहेत. तांब्याच्या भांडयावर निळा रंग चांगला वठतो. चांदीच्या भांडयावर अस्मानी रंग चांगला शोभतो. काश्मीरी मिना पारदर्शक असत नाहीं.भांड्यावरील नक्षी सुद्धां काश्मीर देशांत शालीच्या नक्षीच्या धरतीवर असते. ह्मणजे तिच्यांत सुद्धा सुरूचीं व कैरी वजा झाडें असतात. कधीं कधीं मिन्याचें काम केलेल्या भांड्यावर सोन्याचें पाणीं चढवितात. मिन्याचीं भांडीं वजनावर विकतात. तीं चांदीचीं असल्यास सुमारें सव्वा रुपया तोळा व तांब्याचीं असल्यास अडीच आणे पासून चार आणे तोळा या भावानें मिळतात. काश्मीरांत अहंमदजू, हबीबजू आणि नबीजू हे कारागीर प्रसिद्ध आहेत.
 दिल्लीस पानपुडे, चौफुले, हुक्के व डब्या वगैरे लहान पदार्थ मिना चढवून तयार होतात. दिल्ली येथील काम जयपूर च्या बरोबरीनें चांगलें होतें. मुलतान जंग, भावलपूर, आणि कांग्रा या ठिकाणींही मिन्याचें काम होत असतें. जंग व मुलतान येथें कधी एखादा प्याला, कधीं तबक, किंवा कधीं दुसरें कांहीं लहानसें भांडें अशा किरकोळ जिनसा तयार होतात खऱ्या, तरी व्यापाराकरितां तेथें माल तयार होतो असें ह्मणतां येत नाहीं. भावलपुरास “भोखबा" नांवाचें एक झांकणाचें भांडें तयार होत असतें. त्याची विशेष प्रसिद्धी आहे. दारू पिण्याकरितां लहान लहान वाट्या पूर्वी राजे लोक कांग्रा येथे करीत असत असें त्रैलोक्यनाथ बाबू म्हणतात. या गांवांतील निळ्या रंगाचा मिना इतर