पान:देशी हुन्नर.pdf/81

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ७५ ]

त्या वेळीं ही काठी त्याच्या हातांत होती. ती बावन इंच लांब आहे व तीस लहान नळ्या एकास एक जोडून त्या एका तांब्याच्या भक्कम कांठीभोवतीं बसविलेल्या आहेत. तिची कुबडी किंवा मूळ हिरव्या अकीकाची केली असून तिजवर मौल्यवान रत्नें जडविली आहेत. शेवटली नळी खेरीज करून बाकीच्या बत्तीस नळ्यावर जनावरांचीं व पाखरांचीं चित्रें काढली असून कोठें कोठें सृष्टीतील देखावे मिन्यांत काढलेले आहेत. जनावरांचीं व पाखरांचीं चित्रें फारच सुरेख व हुबेहूब आहेत. मिन्याचा रंग फार स्वच्छ व सतेज आहे. प्रस्तुत काळीं कितीही काळजी घेऊन व जयपूर येथील कोणत्याही कारागिरानें तयार केलेल्या कामापेक्षां या कांठींचे काम फारच चांगलें आहे. प्रस्तुत होत असलेल्या सोन्यावरील उत्तम नमुना युवराज प्रिन्स आफ वेल्स यांस महाराजानीं दिलेल्या सोन्याच्या ताटावर आहे. हें ताट तयार करण्यास चार वर्षें लागलीं. व मिन्याच्या कामाचा मोठ्यांत मोठा नमुना सर्व पृथ्वीत काय तो हाच आहे. सरजॉर्ज बर्डवुड साहेबांचें असें ह्मणणें आहे कीं " हिंदुस्थानांतील मिनागार लोकांच्या कौशल्याचा हा एक ध्वजस्तंभच आहे असें ह्मटलें तरी चालेल. जयपूर येथील मिनागारांचे पूर्वजांस महाराजा मानसिंग यानें लाहोर येथून बोलावून आणिलें असें ह्मणतात. त्यांचा धर्म, व धंद्यास लागणारे साहित्याकरितां पंजाब प्रांतावर त्यांचें अवलंबन या दोन गोष्टींवरून हें ह्मणणें खरें दिसतें. चांदीवर जरी मिन्याचें काम होतें तरी जयपूर येथील कारागीर सोन्याच्याच भांड्यावर विशेष मेहनत घेऊन काम करितात. कारण चांदीवर चांगला रंग वठत नाहीं व तो बिघडण्याची विशेष भीति आहे असें त्यांच्या अनुभवास आलें आहे.

 मिना चढविण्याचे तीन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारांत भीतीवर चित्रें रंगविल्याप्रमाणे भांड्यांवर नुसता रंग चढवितात दुसऱ्या प्रकारांत नक्षी भांड्यावर पहिल्यानें ठोकून किंवा खोदून काढून तिच्यावर पारदर्शक मिना चढवितात. हें दोन्ही प्रकार अर्वाचीन आहेत. तिसरा प्रकार फार प्राचीन आहे. व त्याच्याही दोन जाती आहेत. एकींत भांड्यांच्या पृष्टभागावर धातूचे पत्रे किंवा तार ठेवून त्याची नक्षी करितात. व त्या नक्षीवर मीना बसवून तो पाटावर बसविलेल्या फुल्यांप्रमाणे वरच्यावर चिकटवितात. दुसऱ्या प्रकारांत भांड्यावर नक्षी खोदून काढून तिच्यांत मीना भरतात. आणखी एक चवथा प्रकार जपानी लोकांस माहीत आहे. त्यांत पहिल्यानें भांडयावर मिन्याच्या