पान:देशी हुन्नर.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ २ ]

शांनी आमच्या देशांतील देवस्थाने निर्दाळून टाकिली ; व त्यांतून राहिलीसाहिली ती पोर्तुगालदेशांतील ख्रिश्चन् इनक्विझिशनच्या सपाट्यांत सांपडून समूळ नाहीशी झाली. असे असतां ही अजंटा येथील लेणी शिल्लक राहिली याचे कारण आहे. ज्या डोंगरांत ती कोरली आहेत त्याच्या आसपास माजलेलें दाट जंगल व त्या जंगलांत सहजी पोसली गेलेली हिंस्र जनावरे ही ह्या धर्मवेड्या लोकांस प्रतिबंध करीत असें ह्मणा, किंवा डोंगरावरील उंच खोऱ्यांत अशी काही लेणी आहेत किंवा नाहीत याचा तपास करण्याकरितां उंच उंच व बिकट रस्ते चढून जाण्याचे श्रम करण्याचे यवनांस सुचलें नाहीं असें म्हणा. कारण काही असो आज ती शिल्लक आहेत हे खरे आहे. मेजर जेल नांवाच्या साहेबाने ही लेणी इंग्रजसरकारच्या नजरेपुढे आणून दिली. त्याने ती साफ करविली त्या वेळीं आंतील चिखल व गाळ काढतांना त्यास मनुष्याची हाडेंं सांपडली. व लेण्यांच्या आसपास वाघाचे पंजे चिखलांत उठलेले आढळलेंं यावरून तेथेंं कोणच्या प्रकारची वस्ती होती हे स्पष्ट दिसत आहे. जेल साहेबानेही या ठिकाणी आपण स्वतः वाघ व तरस मारले असा ' रपोट' केला आहे. असो.

 ही लेणींं चित्ररेखकाच्या दृष्टीने फारच सुरेख आहेत. यांची वाखाणणी आह्मीं करूंच करूं. पण चित्ररेखनविद्येत निपुण असे परराष्ट्रीय लोक सुद्धा ही लेणी पाहून मान डोलवितात असें मे. ग्रिफिथस साहेब, मुंबईतील चित्रशाळेवरील मुख्याधिकारी यांचे या लेण्याबद्दलचे मत खाली दिलेंं आहे त्यावरुन स्पष्ट होईल.

 ग्रिफिथस साहेब म्हणतात:-" या चित्रकारांची कर्तबगारी मोठी जबरदस्त असली पाहिजे. कुंच्याच्या एका झटक्याने कांहीकांही ठिकाणी त्यांनी इतकी चमत्कारिक कर्तबगारी दाखविली आहे कीं, ती पाहून मी अगदीं थक्क झालो. तें तर असोच; परंतु लेण्याच्या छतावर जेथें काम करणे फार कठीण अशा ठिकाणी काढलेले काही वेल इतके सुबक आणि इतके शास्त्रशुद्ध आहेत, की त्यांजकडे पाहून हे पूर्वीचे चित्रकार मानवी नसावेत असे मला वाटू लागले. हिंदुस्थानांतील चित्रशाळेतील मुलांस शिकविण्याकरितां कित्त्या दाखल जे नमुने ठेवावयाचे ते यांतीलच असावे. यापेक्षा चांगले नमुने इतर कोठेही शोधून मिळतील असे मला वाटत नाही. अहाहा! यांची कौशल्यदेवता मजपुढे प्रत्यक्ष उभी आहे कीं काय असा भास होतो? या चित्रांतील कांहींं चेहेरे प्रश्न करिताहेत, कांहींं जबाब देत आहेत, काहींं हंसताहेंत, व कांहींं रडताहेत ; कांहीं