पान:देशी हुन्नर.pdf/67

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ६१ ]

दाखवितात. व अखेरीस पस्तावा पावून ५० रुपये देऊन चार आण्याचा माल घेतला या बद्दल चुरचरत बसतात. पुढें 'तेरेबी चीप् और मेरीबी चीप्.' पोलिसांत वर्दी देतां येत नाहीं व भामटा पुन्हा हातीं लागण्याचा संभव नाहीं व मिळाला तर आपण चोराचे भागीदार बनणार ही भीति आहेच. अशा रीतीनें पुष्कळ लोकांचें नुकसान झालेलें आमच्या कानीं आलें आहे. तेव्हां पुढें ही गोष्ट वाचून त्यांनी सावध रहावें अशी आमची त्यांस सूचना आहे. रस्त्यांत सांपडलेला दागिना खरा असो अगर खोटा असो तो पोलिसांत द्यावा हा उत्तम मार्ग व त्यांत एखादा भामटा हातीं लागत असेल तर त्यासही सरकार दरबारीं पोहोचविण्याचें साधलेच तर तेंही काम मोठ्या चतुराईनें उरकून घ्यावें.

 बंगाल्यांतही कोठें कोठें खोटे दागिने तयार होतात.

 हलक्या प्रकारचे खोटे दागिने ह्मणजे ते दुरून खऱ्या सारखे दिसावेत परंतु जवळ घेऊन पाहिले तर त्याच्या खोटेपणाबद्दल कधींच शंका राहूं नये. असले दागिने दिल्लीस पुष्कळ तयार होतात. मेहेरबान किपालिंग साहेब यांनीं या दागिन्याचें जें वर्णन केलें आहे त्यावरून यांचे अंगीं सुबकपणा व स्वस्तपणा हे दोन्ही गुण चांगलेच असतातसें दिसतें. आलीकडे त्यांचे स्वरूपांत भेसळ दृष्टीस पडूं लागली आहे; परंतु कसबाची इतकी कमाल आहे कीं अस्सलाचा भाग कोठपर्यंत व भेंसळ कोठून याचा निर्णय ठरविणें मुष्किल होतें. त्यांच्या स्वस्ताई बद्दल ही अशीच विस्मयकारक हकीकत आहे. निरनिराळ्या तऱ्हेच्या, निरनिराळ्या जिनसेच्या व निरनिराळे रीतींने गाठवलेल्या अशा ३२ माळांची किंमत अवघी दोन रुपये. या सर्व कारणानीं दिल्ली या जिनसांबद्दल फारच प्रसिद्ध होऊन बसली आहे.

बांगड्या व चुडे.

 कांचेच्या बांगड्या व लाखेचे चुडे जिकडे तिकडे होतात. आपल्या देशांत तांबडी, हिरवी, आणि काळी या तीन रंगाची कांच होते. परंतु लाखेच्या रंगाचा मात्र नेम नाहीं. सुरतेस चुडे फार चांगले होतात. पितळेच्या पाटल्या करून त्यांजवर लाख चढवून त्या लाखेवर टिकल्या बसवून तयार केलेले चुडे दोन आण्यापासून सहा आण्यापर्यंत विकत मिळतात. कांचेवर लाख चढवून केलेले चुडे ह्याहून स्वस्त मिळतात. गाझीपूर, बनारस, लखनौ, आणि दिल्ली या