पान:देशी हुन्नर.pdf/49

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ४३ ]

जातिभेदामुळें पूर्वीच्या कारागिरांच्याच वंशांतले आहेत; त्यामुळें त्यांचे गुण यांच्याअंगीं जन्मतःच आलेले आहेत. तारकामाशिवाय हिंदुस्थानांतील सोनाराचे इतर कामांतील कौशल्य प्राचीन फारशी व संस्कृत भाषेप्रमाणे त्यांच्या देशांतील कांहीं घराण्यांत वंशपरंपरेनें वसत आलें आहे. हीं घराणीं कालांतरान्वये बुडत चाललीं आहेत; त्यामुळें तद्देशीय कौशल्याचाही दिवसें दिवस ऱ्हास होत चालला आहे. त्यांत या कामास उतरता पाया लागण्यास आणखीं एक कारण झाले आहे. तें कोणतें ह्मणाल तर आपल्या पूर्वजांचा धंदा सोडून देऊन इतर धंदा पत्करण्याची अलीकडील लोकांची आवड हें होय.

 आमच्या देशांतील ठाकूर, भिल्ल, कोळी, वारली वगैरे जंगली लोकांत पाहिजे त्या पदार्थाचे दागिने करतात, असें जरी आहे तरी फार पुरातन काळापासून जवाहिराचे सुद्धां दागिने या भरतखंडांत होत असत असें सिद्ध करून देतां येतें. पृथ्वींतील सर्व ग्रंथांत जुना ग्रंथ जो ऋग्वेद त्यांतील "रुद्रदेवता " सुवर्णाच्या चकचकीत दागिन्यांनी सुशोभित केलेली आहे. तसेंच त्याच सनातनग्रंथांत वर्णन केलेले असुर सोन्याचे व रत्नाचे दागिने घालीत असेंही वर्णन आहे. याच ग्रंथांत “कक्षिवत" ऋषीनें सोन्याच्या कुंडलांनी व रत्नजडित कंठीनें सुशोभित असा पुत्र आपल्यास प्राप्त व्हावा हें देवाजवळ मागणें मागितलें.

 पाश्चिमात्य धर्मसंस्थापक येशूख्रिस्त याचा जन्म होण्यापूर्वी हजारों वर्षे ह्या गोष्टी हिंदुस्थानांत माहित होत्या हें येथें लक्षात ठेवण्यासारखें आहे. तत्रापि असें असून सुद्धां या भरतखंडांतील अगदीं मूळचे रानटी स्थितींतील दागिने अजून नाहींसे झाले नाहींत. अगदीं अलीकडेसुद्धां बंगाल्यांत शंखाच्या शिंप्याचें कंकण हातांत घातल्याशिवाय आपण शुद्ध होत नाहीं असें सुवासिनी स्त्रियांस वाटत असे व हा " मौल्यवान ", दागिना हातात घालण्यापूर्वी त्याजबद्दल कांहीं धर्मसंस्कारही होत असे. हीं कंकणें एका तबकांत ठेवून त्यांची शेंदूर, दुर्वा, तांदुळ यांनीं पूजा करीत. व तीं आपल्या घरीं विकावयास आणणाऱ्या मनुष्यांस शिधा देत. शंखाची कंकणें बंगाली लोकांच्या कालिका देवतेस प्रिय आहेत. त्या प्रांतीं एक गाणें अजून गातात. त्यात शंकर दरिद्री असल्यामुळें त्याच्यानें शंखाची नवीन कंकणे पार्वतीला देवविलीं नाहींत त्यामुळें त्या दोघांचा मोठा तंटा झाला त्याचें वर्णन आहे. बंगाल्यांत लोखंडाचें कंकण कपाळाच्या कुंकवाप्रमाणे मानलें आहे. व तें डाव्या हातांत जी बायको घालणार नाहीं तिच्या नवऱ्याचें कधीही कल्याण होणार नाहीं