पान:देशी हुन्नर.pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ४० ]

कांस पेंढा गुंडाळून त्याच्यावर कातडें लावून त्यानें वाजवितात. या कातड्यामुळें अवाज कर्कश निघत नाहीं.

 मृदंग--हें वाद्य ब्रह्मदेवानें शोधून काढलें असें ह्मणतात.

 पखवाज--हा मृदंगापेक्षां फार लांब असतो. त्यामुळें त्याचीं तोंडें फार लहान असतात.

 ढोलकें--मृदंग व पखवाज याचें रानटी भावंड आहे.

 बाह्या व तबला–-हें मृदंगाचेंच दोन्ही बाजूचे आवाज दोन वेगळ्या आवाजानीं काढण्याचें अर्वाचीन साधन आहे. तबल्याला कधीं कधीं दहिना ह्मणतात. बाह्या ह्मणजे डावा आणि दहिना ह्मणजे उजवा हात. यावरूनच हीं नांव पडलीं असावीं.

 धाक-- हें फार मोठें थोरलें ढोल आहे. याची उजवीच बाजू वाजवितात, डावीकडे हात मुळीच लावीत नाहींत.

 ढोल--हें धाक ह्या वाद्याचा धाकटा भाऊ होय.

 दुंदुभि अथवा नौबद--हें प्राचीन काळचे रणवाद्य आहे.

 नगारा-- त्याचेंच धाकटें भावंड.

 धौसे--ही एका प्रकारची नौबद आहे.

 संबळ--हें गोंधळी लोकांचे वाद्य आहे.

 पोंबई--हें संबळासारखे मद्रासेकडे एक वाद्य आहे. त्यांतील उजव्या हाताकडील भाग मृदंगासारखा हातानें वाजवितात व काठीला दोरी गुंडाळून तिच्या टोंकानें दुसरा भाग घांसतात.

 गोंधालम--हें झाडाच्या कुंडीच्या आकाराचें दोन भाग एके ठिकाणी बांधलेलें असें असतें.

 गिडीकट्टी--वरच्याचेंच लहान भावंड होय.

 डमरू--याला मद्रासेकडे उडुकई असें ह्मणतात.

 खोळ--हें मद्रासेकडील एक वाद्य आहे. हें नेहमीं कीर्तनाच्या वेळीं वाजवितात.

 खंजिरी-- या वाद्याला बारीक लहान लहान झांजा लाविलेल्या असतात.

 डिमडिमी--खंजिरीचें लहान भावंड.