पान:देशी हुन्नर.pdf/44

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ३८ ]



मद्रासेकडे "पुलंगोलल" ह्मणतात. हें वाद्य कृष्णाने शोधून काढिलें असें ह्मणतात.

 सरलबन्सी–-हें अलगुजासारखें वाद्य आहे.

 लयबन्सी–-हें वाद्य तोंडाच्या एका बाजूनेंच फुंकावयाचें असतें.

 अलगोजा--पंजाबांत अलगुजास हें नांव आहे.

 नायरी--हें लांकडाचे एक वाद्य आहे. त्याच्या योगानें सुराचा भरणा होतो.

 वेणू--ओढिया प्रांतात वेणूला बेणू म्हणतात. परंतु ती चार पासून सहा इंच लांब असते.

 कलम--ह्मणजे लेखणी. हें वाद्य लेखणीसारखें असते.

 अलकूजा–-हें आपल्या अलगूजा सारखें दक्षिणेंतील वाद्य आहे.

 मगविणें--हें नारळाच्या पोग्यापासून तयार केलेलें सनईसारखें एक वाद्य आहे.

 कर्णा-- याला ताडाच्या पानाची व कधीं कधीं हस्तीदंताची पिंपारी असून खालीं पितळेचें असतें.

 नागसरम–-हेंही नारळाच्याच पोग्याचें केलेलें असतें.

 सुरणा--याला पुढें सात व मागें एक भोंक असतें. याचीही पिंपारी ताडाच्या पानाची असते.

 पंचम उत्थू--लांकडाच्या नळीवर चामडें लावून व पितळेच्या कड्या लावून तयार केलेलें हें एक मद्रासे कडील वाद्य आहे. याला एकच भोंक असतें. याचा आपल्या “सूर" नांवाच्या वाद्यासारखाच उपयोग होतो.

 उत्थू--हें वरील वाद्यापेक्षां जरा लहान असतें.

 सनई--चौघड्याबरोबर वाजविण्याचें हें एक वाद्य आहे.

 थिरुचिन्नम--हा कर्णा असावा.

 कोंबू--हा S या आकाराचा एक कर्णा आहे.

 शृंग--हें शंकरापुढें वाजविण्याचें एक वाद्य आहे.

 रणशृंग--हें लढाईच्या वेळीं आपल्या देशांत पूर्वी वाजवीत असत तें वाद्य.