पान:देशी हुन्नर.pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ २५ ]

काम करण्याचे कामीं प्रचारांत येईल तर फार चांगलें होईल, व विलायतेस दिवाणखान्याच्या भिंतींस कागद चिकटविण्याकडे जितका पैसा खर्च होतो, त्यापेक्षां थोड्या खर्चात दगडीच्या दगडावरील नक्षींचे सुरेख काम सहज होऊं शकेल. बाबू त्रिलोकनाथ मूकरजींस हा दगड पसंत नाही. त्यांचें म्हणणें आहे कीं, तो दगड फारच भुसभुशीत आहे, त्यामुळें त्याची नक्षी फुटून जाऊन लवकरच विद्रूप दिसूं लागेल; परंतु कानडा जिल्ह्यांतील शिरसी गांवातील अनंत पी. नादिग नांवाच्या गृहस्थाने या दगडाच्या एका कोरींव फुलाच्या परडीस कांहीं मालमसाला लावून ती पुष्कळ टणक करून कलकत्त्यांतील प्रदर्शनांत पाठविली होती; व तेथें तिजवरून त्यांची वाहवा होऊन त्यांस हुशारीचा दाखला मिळाला होता. ही गोष्ट आमच्या बाबूसाहेबांच्या नजरेस आली नाहीं असें वाटतें. मेहेरबान कर्नल जेकब साहेब यांच्या नजरेखाली जयपूर मुक्कामीं दगडावरील जाळीचें काम पुष्कळ तयार होत आहे, या गोष्टीचा उल्लेख मागें आलाच आहे.

 भरतपूरसंस्थानांत रूपकत गांवीं असलेल्या 'जांभ्या ' दगडाच्या खाणींतून काढलेल्या एका प्रकारच्या दगडावर जाळीचें काम खोंदण्याची वहिवाट आहे.

 बिकानेर प्रांतीं एका चौरस फुटीस वीस रुपये या भावानें संगमरवरी दगडावर खोदलेलें जाळीकाम विकत मिळतें. हेच काम 'जांभ्या ' दगडावर तयार केलेलें असलें तर त्यास दहाच रुपये पडतात. चुरू, सरदार शहर, व बिकानेर या गांवीं दगडाचे कोरींव झरोके आयते तयार करून दोनशेंपासून हजार रुपयांपर्यंत विकण्याची चाल आहे.

 अलवार संस्थानांत पांढऱ्या रंगाच्या संगमरवरी दगडावर जाळीदार काम कसून तें काळ्या संगमरवरी दगडाच्या किंवा सागाच्या लांकडाच्या चौकटीत बसवितात. अलवार येथील राजवाड्यावरील कांहीं नक्षीचे नमुने लंडन येथील प्रदर्शनांत सन १८८६ सालीं गेले होते. ह्या अलवारसंस्थानांत एका जातीचा दुधासारखा पांढरा संगमरवरी दगड पुष्कळ सांपडतो.

 करवलीसंस्थानांतही 'जांभा ' दगड पुष्कळ सांपडत असून त्याजवर केलेलें जाळीकाम दोन पासून चार रुपये चौरस फूट या भावानें विकत मिळत.धोलपूर, बारी आणि श्री मथुरा या गांवींही असलें काम तयार होतें.