पान:देशी हुन्नर.pdf/202

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ २०४ ]

 [ फ ] डंगरी ह्मणजे जाड्याभरड्या कापडावर कच्च्या रेशमानें काढलेला कशिदा.

 [ ग ] सखलाद वगैरे लोकरी कपड्यावर रेशमी कशिदा.

 यांतील डंगरी कापडावरील काम पूर्वी मद्रास इलाख्यांत होत नसे, परंतु मिसेस कार्मायकेल नांवाच्या एका मडमेनें लंडन शहरांतील एका सर्व संग्रहालयांतून उत्तर हिंदुस्थानांतील कांहीं नमुने आणून ते मद्राशी लोकांस दाखवून दिले, व तसे तयार करण्याविषयीं तेथील गरीब स्थितीत असलेल्या मुसलमान लोकांच्या बायकांस तयार करण्याविषयीं उत्तेजन दिलें.

 इंग्रजी ग्रंथकार लोक सदरील मडमसाहेबांस मद्रास इलाख्यांत हा एक नवीन धंदा काढल्याचें श्रेय देत असतात.

 या इलाख्यांतील द्रवीड लोकांच्या देवळांत मूर्तीच्या अंगावर घालण्याकरितां एक कशिद्याचें कापड तयार करीत असतात. ह्याचें काम फार प्राचीन धरतीवर असून मोठें सुरेख असतें असें ऐकितों.

 मद्रास इलाख्यांत उत्तरआकीट, पलनकट्टा (जिल्हा तिणवल्ली ) त्रिचनापल्ली, गोदावरी, व तंजावर या ठिकाणीं कशिद्याचें काम विशेष होतें. त्रावणकोर येथें कलाबतूचा कशिदा काढितात. निजामशाईंत औरंगाबादेस कारचोबी काम फार चांगलें होते. कलबुर्ग्यासही कशिदा काढितात. परंतु तो औरंगाबादे इतका चांगला होत नाहीं.

 असाम प्रांती कच्च्या रेशमाचा कशिदा काढण्याचें काम बायकांच करितात. 'खनिया कापार' ह्मणून एका प्रकारची शाल त्या प्रांतीं प्रसिद्ध आहे. तिजवर फारच सुरेख काम केलेलें असतें 'खनियाच्या खालोखाल 'चेलगें' ह्मणून एक कपडा आहे, त्याजवर व 'परीदिया कापर' याजवरही अशीच उत्तम नक्षी काढलेली असते. या कापडास चाळीस पासून दोनशें रुपयांपर्यंत किंमत पडते. रेशमी कापडावर कशिदा काढतात त्यास 'रिहासव' 'येरा' 'बरंकापर' अशीं नांवें आहेत. असाम प्रांतीं मुगा नांवाच्या किड्यापासून रेशीम उत्पन्न होत असतें. मुंबईत मेमण लोकांच्या पागोट्यांवर बदामी रंगाच्या रेशमाचा कशिदा पाहण्यांत येतो, तो या मुगा नांवाच्या रेशमानें काढिला असतो.