पान:देशी हुन्नर.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ २०३ ]

मध्य हिंदुस्थानांत रतलाम येथें घोड्याचे खोगीर व दातिया येथें 'बुद्धिबळांचे पट ' तयार होतात. 'सरखारी' गांवीं बुद्धिबळांच्या पटावर, कलाबतूचा कशिदा काढितात. धार येथें टोप्या, तलवारीचें पट्टें, बटवे, वगैरे काम होतें. अलिजापुरास बंदुकिची तोसतानें तयार करितात. बऱ्हाणपूरास कलाबतूचा कशिदा चांगला होतो.

 वायव्य प्रांती लखनो, बनारस, व आग्रा या गांवीं मखमालीच्या टोप्यांवर कशिदा काढीत असतात. लखनो येथें मलमलीवर बादलाचा (चपटया तारीचा) कशिदा काढितात त्यास 'कामदानी' असें नांव आहे. मखमलीवर कलाबतूचें काम केलें ह्मणजे, त्यास " झरदोज " असें ह्मणतात. लखनौशहरांतून, मुलांचे अंगरखे, टोप्या, इजारी, सपाता, गशि, वगैरे अनेक जिनसा तयार होऊन बाहेरगांवीं जातात. येवले, व पुणें यागांवा प्रमाणें, दिल्ली येथेंही कलाबतू पुष्कळ तयार होतें. लखनौ व बनारस यागांवीं, जरीच्या निशाणावर कशिदा काढीत असतात. आग्र्यासही हें काम पुष्कळ होतें. फत्तेपुरास काठ्या व चाबुक यांजभोवती एकाप्रकारची कशिद्यासारखी नक्षी करितात. असलें काम सुरतेसही होतें. बंगाल्यांत, शांतीपुरास सुतीकापडावर कशिदा काढितात. मालडा, राजशाही, नदीयाआपुरी, आणि इतर जिह्यांत कशिद्याच्या " सुजन्यां " तयार होतात. कलकत्यास मलमलीवर कच्च्यारेशमाचा एका प्रकारचा कशिदा करीत असतात त्याकामास चिकन काम असें ह्मणतात मुर्शिदाबाद आणि पाटणा या गांवीं कारचोबी काम होतें.

 मद्रास इलाख्यांत कशिद्याचें काम होतें त्याचें प्रकार खालीं लिहिल्याप्रमाणें आहेत.

 [ अ ] मलमलीवर सुतानें काढलेला कशिदा.

[ ब ] जाळीच्या कापडावर रेशमानें काढलेला कशिदा.
[ क ] जाळीच्या कापडावर रुपेरी कलाबतूनें काढलेला कशिदा.
[ ड ] जाळीच्या कापडावर सोनेरी कलाबतू व माशीचें पंख बसवून काढलेला कशिदा.
[ इ ] जाळाच्या कापडावर सोनेरी किंवा सोनेरी व रुपेरी कलाबतूचा कशिदा.