पान:देशी हुन्नर.pdf/200

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ २०२ ]

यामुळें हलका माल तयार होतो. गुजराथ, नुरपूर व सियालकोट या गांवीं कधीं कधीं शाली विणतात.

 अलिकडे उत्तम शाली फारशा विकत नाहीत, त्यामुळे चांगले काम काढण्यास व्यापारी लोक धजत नाहींत.

 अलिकडे साहेब लोकांत फुलकारी ह्मणून एक कशिदा काढलेलें कापड आहे त्यास गिऱ्हाईकी पुष्कळ आहे. कच्छ देशांतील रबारी लोक व खानदेशांतील चारण लोक याच्या बायका प्रकाणे पंजाब व राजपुताना प्रांतांतील जात लोकांच्या बायका पांच सहा हात लांब व दोन अडीच हात रुंद खारव्याचा किंवा इतर जाडया कापडाचा तुकडा घेऊन त्यांजवर कशिदा काढून, तो आपल्या महाराष्ट्र देशांतील फडकीप्रमाणें किंवा शालीप्रमाणें अंगावर घेतात. यालाच फुलकारी असें नांव आहे. साहेब लोक फुलकारीचा पडद्याप्रमाणें उपयोग करितात. फुलकाऱ्या अमृतसर, सियालकोट, माँटगांमेरी, रावळपिंडी, फिरोजपूर, हजारा, बानू, हिसाल, लाहोर, करनाळ, कोहात, देराइस्मायलखान, रोहतक, इत्यादि गांवीं होतात. त्यांत हजारा या गांवचा माल चांगला असतो अशी ख्याती आहे. कशिदा काढतांना त्यांत कांचेचे तुकडे बसविले ह्मणजे फुलकारीस 'शिशादार ' फुलकारी म्हणतात. हे कांचेचे तुकडे तव्यासारखे एका बाजूस खोलगट असतात. अमृतसर येथें 'देवीशाई आणि चंबान' व 'देवीशाई आणि प्रभुदयाळ ' या दोन कंपन्या फुलकाऱ्याचा व्यापार करितात. फुलकारीस पांच रुपयांपासून वीस रुपयेपर्यंत किंमत पडते.

 चंबा आणि कांग्रा यांगावीं चंबारुमाल यानांवानीं प्रसिद्ध असा काशिदा काढलेला चौकोनी कपडा तयार होतो. चंबा येथील राणी महालांत तयार झालेला असला एक रुमाल लंडन शहरांतील इंडियन म्युझियम नांवाच्या सर्वसंग्रहालयांत आहे. सोन्या रुप्याच्या कलाबतूचा कशिदा डेराइस्मायलखान व पतियाला या दोन गांवीं तयार होतो. घोडयांचें व उंटाचे खोगीर व इतर सामान डेराइस्मायलखान येथें तयार होतें. राजपुतान्यांत कोंटा संस्थानांत शरेगड गांवीं ही घोड्याचे खोगीर व हत्तीच्या अंगावर टाकावयाचें गासे तयार होतात. अजमीर येथील एका व्यापाऱ्यानें कशिद्याचे काम करण्याचा एक कारखाना काढिला आहे. बिकानेर, जोधपूर, अलवार इत्यादि ठिकाणीं कशिद्याचें काम मधून मधून आढळतें.