पान:देशी हुन्नर.pdf/188

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १९० ]

जवरील रंग काळसर दिसूं लागला, तर लिंबाचा रस आणि पाणी एकत्र करून त्यांत बुडवून धुऊन पुनः सुकवावें.
 नारिंगी अथवा केशरीहा रंग तांबड्या रंगाप्रमाणेंच करावयाचा परंतु त्यांत हळदीची पूड टाकावी लागते. तीच 'कोचा' हळद घेतली तर रंग विशेष चांगला वठतो. हळदीच्या किंवा 'कोचा' हळदीच्या पाण्यांत रेशीम बुडविलें ह्मणजे पिवळें होतें परंतु तो रंग टिकत नाहीं.
 हिरवातांबडा रंग देण्याकरितां पापडखाराचें व साबूचें पाणी तयार करितात. तसेंच तयार करून त्यांत रेशीम उकलवून निळीच्या 'मिठा' पिंपांत बुडवावें. व नंतर हळदीच्या काढ्यांत बुडवून पुष्कळ कालवावें. आणि अखेरीस लिंबाचा रस घातलेल्या पाण्यात भिजवून धुऊन सुकवावें.
 पिंवळापक्का पिंवळा रंग 'इस्पारक' नावाच्या एका झाडाच्या काड्यांपासून होतो. कच्चें रेशीम पापडखाराच्या व साबूच्या पाण्यात उकळवून, फटकीच्या पाण्यांत एक रात्र भिजत ठेवून, धुऊन काढावें. 'इस्पारका' च्या काड्यांचा काढा करून त्यांत थोडा पापडखार टाकून, तें पाणी कढत आहे तोच गाळावें. या पाण्यांत फटकीचें पाणी चढविलेलें रेशीम बुडवावें व खालवर कालवावें ह्मणजे त्याजवर पिंवळा भडक लिंबासारखा रंग चढतो. हा रंग विटत नाहीं. पक्का हिरवा रंग करणें असल्यास हेंच पिवळें कापड गुळीच्या 'मिठा ' पिंपांत बुडवून काढावें व धुतल्याशिवाय वाळवावें.
 नारिंगी अथवा केशरी रंगहा रंग कपिल्याचा होतो. अर्धा शेर साजीखार व पावशेर कळीचा चुना हीं पाण्यात उकळवून त्यांत रेशीम शिजवावें, नंतर पिळून धुतल्याशिवाय ठेवावें. दुसरीकडे चवदा तोळे कपिल्याची पूड व तीन तोळे फटकी, एकत्र करून एका भांडयांत ठेवावी. तिसरीकडे पाण्यांत पापडखार टाकून उकळवावा, व तो कढत आहे तोच त्या पुडीवर ओतून पुष्कळ कालवावें ह्मणजे त्यास दरदरून फेंस येतो. बराच फेंस आल्यावर, वर पिळून ठेवलेलें ओलें रेशीम त्यांत चार तास भिजत ठेवावें नंतर काढून धुवावें.
 'मसीयो' काळारेशमावर काळा भोर रंग देणें असेल तर तें पहिल्यानें गुळीच्या 'मिठा ' पिंपांत बुडवून काढावें. नंतर हरड्याच्या काढ्याचीं त्याजवर तीन चार पुटें द्यावीं. दुसरीकडे बाजरीची आंबील अथवा मेथ्या उकळवून तयार केलेलें पेजेचें पाणी एका भांडयांत घालून आंबत ठेवावें. व ते कुजून त्यास घाण येऊं लागली ह्मणजे त्यांत बीड टाकावा. हें बिडाचें