पान:देशी हुन्नर.pdf/176

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १७८ ]

 अशा रितीनें मुंबईत रंगविलेलें कापड हल्लीं या देशांत विकत नाहीं. ते आरबस्थानांत व ब्रह्म देशांत जातें.

सुरंगीचे रंग.

 सुरंगीचा तांबडा.-सुरंगीस गुजराथेंत 'आल ' असें ह्मणतात. सुरंगीचा रंग पक्का होतो परंतु तो मंजिष्टेच्या रंगापेक्षां फिका आहे, व तो चढविण्यास कपडा शिजवावा लागत नाहीं, थंड पाण्यांत चढतो.
 एरंडीचे तेल व पापडखाराचें पाणी एकत्र करून त्यांत एकरात्र कपडा भिजत ठेवावा. दुसरे दिवशीं काढून न पिळतां किंवा न धुतां सात तास उन्हांत टाकावा. नंतर त्यावर पाणी शिंपडून लांकडाच्या दांडूनें ठोकावा. नंतर एकरात्र तसाच ठेऊन दुसरे दिवशीं पुनः उन्हांत ओपवावा. हीच कृति आठ दिवसर्यंत करावी. नवव्या दिवशीं कापड धुवून सुकवावें ह्मणजे ते रेशमासारखें मऊ होतें.
 सुरंगीची पूड करावी.-व ती मातीच्या कुंडींत टाकून तिजवर पाणी ओतावें. सिंधी तुरटी घेऊन पाण्यांत उकलावी व तें पाणीं कुंडीत असलेल्या सुरंगीच्या पाण्यांत ओतावें, आणि त्यांत कापड घालून पुष्कळसें कालवून चोवीस तास तसेंच असूं द्यावें. हीच कृति चार दिवस करावी ह्मणजे कापडावर रंग चढतो. अखेरीस तें धुऊन सुकवावें.
 पावशेर पापडखार व दोनशेर पाणी एकत्र करून त्यांत कपडा बुडवून सुकवावा.
 सुरंगीचा तांबडा रंग दीव, खंबायत, सुरत, अमदाबाद आणि मुंबई या गांवीं करितात.
 याप्रमाणें रंगविलेले तांबडें कापड मंजिष्टेच्या सदराखालीं सांगितलेल्या काळ्या रंगांत बुडविलें ह्मणजे जांबळें होतें.
 सुरंगीचा रंग मुंबई शहरांत तयार करण्याची कृति वेगळी आहे ती खालीं लिहिल्याप्रमाणें.
 वर लिहिल्याप्रमाणें हरड्याच्या पाण्यांत तयार केलेलें दोन रत्तल कापड घ्यावें.
 तीन शेर पाण्यांत अर्धा रत्तल शेळीच्या लेंड्या कालवून तें पाणी गाळावें व त्यांत तें कापड तीन तास भिजवून ठेवावें. नंतर स्वच्छ पाण्यानें धुऊन सुकवावें.
 नवटांक फडकी, एक तोळा हळद, व चार शेर पाणी, एकत्र करून त्यांत तें कापड दोन तास भिजत ठेऊन मग पिळून धुतल्याशिवाय सुकवावें.