पान:देशी हुन्नर.pdf/175

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १७७ ]
मंजिष्ठेचे रंगाबद्दल आणखी माहिती.

 मंजिष्टेचे रंग देण्याचे पुष्कळ प्रकार आहेत. त्यांत खालीं लिहिलेली कृति उत्तर हिंदुस्थानांतील एका रंगाऱ्याकडून मिळविली आहे. दोन रतल वजनाचें कापड रंगविण्यास जो मसाला लागतो तो:--
 पावशेर हरड्याची पूड घ्यावी व पाणी आठ शेर घेऊन त्यापैकीं थोडें पाणी त्या पुडींत घालून ती प्रथम चांगली भिजवून मग तींत बाकीचें पाणी घालितात, व त्यांत कापड भिजवून ठेवितात.
 तुरटी अदपाव, पाणी चार शेर, व हळद दीड तोळा, ही एकत्र करून त्यांत हरडा चढविलेलें कापड पिळून घेऊन एक तास बुडवून ठेवितात. नंतर त्यांत तें पुष्कळ वेळ मळून पुनः दोन तास तसेंच ठेवितात. मग काढून पिळून धुतल्यावांचून उन्हांत वाळवितात. व दोन दिवस तसेंच ठेवून नंतर पाण्यानें धुऊन पुन्हा सुकवितात.
 अर्धा रत्तल मंजिष्टेची पूड घेऊन तिजवर चार शेर कढत पाणी ओतितात व ती निवली म्हणजे त्यांत वर तयार केलेलें कापड बुडवितात. तें चोवीस तास पर्यंत तसेंच ठेवून तें मधून मधून कालवितात.
 पापडखार पावशेर घेऊन तो पांच शेर पाण्यांत कालवितात. मग तें पाणी स्वच्छ गाळून घेऊन त्यांत मंजिष्टेचे पाण्यांत असलेलें कापड घालून अर्धा तास बुडवून ठेवितात.
 मंजिष्टेची पूडं पाव रत्तल, पाणी चार शेर, हीं एकत्र करून त्यांत कापड टाकून दोन तास उकळवितात. कापडावर रंग चढलासा वाटला म्हणजे त्या भटी खालचा आग्नि विझवून तें तेथेंच निवूं देतात. मग तें कापड धुवून सुकवितात.
 तुरटी दीड तोळा, घेऊन ती सहा शेर पाण्यांत टाकितात, व त्या पाण्यांत रंगविलेलें कापड बुडवून कालवितात,

 एरंडेल तेल दीड तोळा एका भांड्यांत घेऊन त्याजवर दीड शेर कढत पाणी ओतून त्याचा एक जीव होईपर्यत कालवितात व तें आणखी उकळवितात. नंतर निववून तें दुसऱ्या भांड्यांत घेऊन त्यांत रंगविलेलें कापड बुडवितात.

 पावशेर बाभळीचा गोंद घेऊन तो पांच शेर पाण्यात भिजवून मग त्यांत आणखी एक शेर पाणी घालितात व त्यांत कापड बुडवून साफ पिळून वाळवून त्याजवर कुंदी करितात.