पान:देशी हुन्नर.pdf/171

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १७३ ]

सर्वात खत्री लोकच मुख्य आहेत. खत्री हे मुसलमान, हिंदु, किरिस्तांव या तिन्ही जातींमध्यें आहेत. मुसलमान खत्र्यांस रंगरेज ह्मणतात. खत्री लोक मूळ सिंध देशांतून आले; त्यांतील कांहीं लोवरगडास येऊन राहिले. त्यांस लोहाणा असें नांव पडले. व कांहीं हिंगळाज येथें जाऊन काताऱ्याचा व रंगाऱ्याचा धंदा करूं लागले. हिंगळाज येथून हे लोक कच्छ, काठयावाड, व गुजराथ या प्रांतीं पसरले. त्यांच्यांत 'सोराथिया,' व 'सिंधवा ' असे दोन भाग आहेत. सोळाव्या शतकांत दीव, दमण, सुरत या ठिकाणीं डच लोकांनीं कारखाने काढिले. तेव्हां तेथें पुष्कळ खत्री लोकांस चाकऱ्या मिळाल्या. डच लोक चिटें तयार करून गोंवा, मोझांबिक वगैरे ठिकाणीं नेऊन विकीत, खंबायत, अमदाबाद व सुरत या गांवीं छापलेलें कापड सयाम देशांत पुष्कळ जात असे.

रंगाऱ्यांचा कारखाना.

 आमच्या देशांतील रंगाऱ्यांचे राहतें घर किंवा त्यांची झोपडी यासच कारखाना ह्मणावयाचें, परंतु त्यास तें नांव शोभत सुद्धां नाहीं. रंगारी आपलें काम नदीच्या कांठीं किंवा एखाद्या विहिरीवर करितो. कपडे उकळावे लागतात तेव्हां एक मातीचा चुला करून त्याजवरच तो ते काम घेतो. त्या चुल्यालाच रंगाऱ्याची भट्टी ह्मणावयाचें. पाणी साठविण्याकरितां एक दोन रांजण, एक दगडी उखळ, एक दोन मुसळें, व एकाददुसरी घडवंची, इतकें साहित्य असलें ह्मणजे झालें. गुळीचा रंग करणारास एक दोन पिंपें जास्ती लागतात. छाप्याचें काम करणारास एक दोन पाट व कांहीं नक्षी कोरलेले लांकडाचे ठोंकळे लागतात. या देशांत रंगारी काम करितात ती जागा फार घाणेरी असते. तींत व्यवस्था ह्मणून मुळींच असत नाहीं. नीट नेटकेपणाचा गंधही नसतो. एकंदर धड कोणतीच सोई नसते. तिकडे पाहिलें ह्मणजे साधेपणा, दारिद्र्य, व गांवढळपणा, यांचेंच चित्र डोळ्यांपुढें उभें राहतें. देशी रंगारी सर्व काम आपल्या हातानेंच करितो. यंत्रें त्याचे जवळ मुळींच नसतात, व हत्यारें असतात तींही अगदीं ओबड धोबड, इतक्याही प्रकारची उणीव असुन व आमच्या रंगाऱ्यास रसायनशास्त्राचा गंधही नसतांना त्यांच्या हातून जें कांहीं काम होतें तें पाहून पृथ्वींतील मोठमोठे सुधारलेले लोकसुद्धां कांहीं वर्षांपूर्वी चकित होऊन तोंडांत बोट घालीत. व अजूनही त्याच्या अकलेची व कौशल्याची तारीफ करितात.
   २३