पान:देशी हुन्नर.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ ११ ]

गल्यास बरीच वर्षे झालीं. रंगीबेरंगी काम छापून काढण्याची कला आमच्या पश्चिम हिंदुस्थानांत स्वतंत्र रीतीने सुरू करण्याचें यश कैलासवासी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनीं मिळविलें. त्यांनीं सुरू केलेली चित्रशाळा या गोष्टीची साक्ष देत आहे. या चित्रशाळेत छापलेली चित्रं हल्ली जिकडे तिकडे विकत मिळतात. कलकत्ता येथें आर्टस स्टूडियो नांवाच्या छापखान्यांतही रंगीत चित्रें तयार होत असतात. परंतु त्यांच्या पोशागांत फार गडबड असते. बंगाली लोकांचा पेहराव, अगदीं कोता ह्मणून कलकत्ता येथील चित्रकार उत्तरहिंदुस्थानांतील लोकांचा पोशाख देवादिकांच्या आंगावर घातला आहे असें चित्रांत दाखवितात; परंतु तो पडला मुसलमानी, तेव्हां हिंदूंचे देव आणि मुसलमानांचा पेहराव, असा एकच गोंधळ होऊन जातो. पुण्यांतील व कलकत्यांतील छापील चित्रांत रंगाच्या संबंधानें चुका सारख्याच होतात. दोन्हीकडील रंग भळभळीत असून त्यांत नैसर्गिकत्वाचा लेशही नसतो. परंतु ही चूक छापणाराची नसून विकत घेणाराची आहे. गिऱ्हाइकांस आवडेल तसाच माल तयार करणें भाग असल्यामुळें आपल्यास पसंत नसलेले रंग सुद्धां वापरावे लागतात. आमच्या देवांची चित्रें विलायतेहून छापून येऊं लागलीं आहेत. हा व्यापार बंद करणे आपल्या हातीं आहे. आमच्या लोकांनीं आपल्या छापखान्याचें नांव राखण्याकरितां चांगलीं चांगलीं चित्रें नांवांनीं छापावीं व तीं जास्ती दरानेंही विकावी ; परंतु गरीबगुरीब लोकांत स्वस्त दराने विकण्याकरितां वेगळींच चित्रें छापवून विकीत जावीं. त्यांत रंग थोडे परंतु ठळक ठळक घालावेत ह्मणजे झालें. ही कला परकीय लोकांची असून आमचेकडे आल्यास तिला थोडेच दिवस झालें आहेत. यामुळें या कलेचा प्रसार अजून फारशा ठिकाणी झाला नाहीं.

फोटोग्राफ.
प्रकाशलेखन कला

 हीही कला आमचे लोकांनीं उसनीच घेतलेली असल्यामुळे या कलेंत निपुण झालेल्या लोकांची संख्या आपले लोकांत फारच लहान आहे. तरी ज्या थोड्या गृहस्थांनी या कामांत पुढे पाऊल टाकलें आहे, त्यांनी बराच लौकिक संपादन केला आहे. या सर्वांत उत्तम प्रसिद्धीस