पान:देशी हुन्नर.pdf/155

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १५७ ]

असें म्हणतात. हें केशरी पिंवळ्या रंगाचें असून त्याचे कोश शेंपन्नास किडे मिळून एक ठिकाणीं चिकटून अंगूराच्या घडांसारखें कोशांचे घड तयार करितात.

 नामदार ईष्ट इंडिया कंपनीच्या हातीं हिंदुस्थानचा राज्यकारभार होता त्यावेळीं बंगालप्रांतीं किड्यांपासून पुष्कळ रेशीम उत्पन्न करून इंग्रज लोक यूरोपखंडांत पाठवीत असत, परंतु कंपनी सरकारानें आपलें रेशीम उत्पन्न करण्याचे कारखाने बंद केल्यामुळें व स्वदेशी लोकांनीं तयार केलेला माल चांगला निघेनासा झाल्यामुळें, हा व्यापार अगदीं बंद पडावयाची वेळ आली होती, इतक्यांत सरकारांतून रेशमाच्या व्यापाराची वृद्धि होण्याविषयी सन १८५५ सालीं प्रयत्न सुरू झाला. लीक शहरांतील रेशमाचे प्रसिद्ध व्यापारी मेहेरबान टामस् वार्डल् साहेब यांस विलायत सरकारानें मुद्दाम या देशांत पाठविलें. या साहेबानीं गांवोगांव फिरून रेशमाच्या किड्यांबद्दल व जातीजातींच्या रेशमाबद्दल पुष्कळ माहिती मिळवून नेली.हिंदुस्थानासारख्या सुपीक देशांत चीनदेशांतून रेशीम येऊन त्याचे कपडे होतात हें पाहून साहेब महशूर यास मोठा चमत्कार वाटला ते म्हणतात:

 "हिंदुस्थानांतील रेशमाबद्दल आजकाल मनाला फार दुःख होणारी एक गोष्ट माझ्या दृष्टीस पडली. मी नुक्ताच सर्व हिंदुस्थानभर फिरून आलों त्यावेळीं मी जिकडे जाई तिकडे रेशमाचे उंची कपडे विणण्यास चीन व इराण देशांतून रेशीम आणावें लागतें हें पाहून मला अतिशय दुःख होई. खरें म्हटलें असतां असें होण्याचें काहीं कारण नाहीं. फक्त एक बंगालप्रांत जरी धरिला तरी त्यांत कोणी मेहेनत करील तर रेशीम इतकें उप्तन्न होईल कीं, तें हिंदुस्थानांतील सर्व देशांत पुरून इतर देशांतही पाठवितां येईल. हिंदुस्थानांत कद, पितांबर, पैठण्या वगैरे कपड्यांस व कशीदा काढण्यास रेशीम फार लागतें हें मला माहीत आहे. हिंदुस्थानांतील कारागीर युरोपियन लोकांच्या नजरेखालीं काम करीत असला तर त्याच्या हातचें काम फारच सुरेख होतें.हा कारागीर शांतपणें एकसारखी मेहनत करून पूर्वापार आपले वाडवडील ज्याप्रमाणें काम करीत आलें त्याचप्रमाणें आपणही प्राचीन धरतीवर मोठ्या कुशलतेनें काम करीत असतो. त्यांत काहीं फेरफार करण्याची इच्छा नाहीं.परंतु पाश्चिमात्य लोकांचें तसें नाहीं, त्यांची बुद्धि विशेष तीव्र आहे, व त्यास प्रत्येक गोष्टींत विशेष सुधारणा करण्याची
   २०