पान:देशी हुन्नर.pdf/150

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १५२ ]

किंवा गंरूम या नांवाचें कापड तयार होत असतें, त्यास ठाणाक्लाथ प्रमाणें लुधियानाक्लाथ असें नांव पडलें आहे, व त्याचा उन्हाळ्यांत युरोपियन लोक कपडे करण्याकरितां उपयोग करितात.

 राजपुतान्यांत जयपूर प्रांतीं सुसी, मान्हा, गझी, आणि दोसुती इतक्या प्रकारचें कापड होत असतें. विलायतेहून आणलेल्या बारीक सुताची मलमल कोटा या गांवचें हिंदु व मुसलमान कोष्टी विणतात. त्यांत बहुतकरून मलमली पागोटींच जास्ती होतात. कोटा येथून दरसाल पंचवीस हजार रुपयांचा माल निमच व इतर ठिकाणीं जातो. या पागोट्यास चार पासून १५ रुपये किंमत पडते. अजमीर, बिकानेर, करवली, जयपूर, व जोतपूर या गांवीं सुसी व इतर सुती कापड होत असतें.
 शिंदेसरकारच्या राज्यांत चंदेरी गांवीं बारीक पागोटीं, शेले, उपरणी, धोतरें, दुपेटे वगैरे पदार्थ होतात. धोतरास व उपरण्यास रेशमी शुभ्र कांठ असतात. किंवा कधीं कधीं हे कांठ दुरंगी असतात. ह्मणजे एका बाजूला तांबडें व दुसऱ्या बाजूला हिरवे, पिवळे व इतर रंगाचें कांठ असतात. ग्वाल्हेरीस दोरव्याची मलमल तयार होत असते.

 होळकरसरकारच्या राज्यांत इंदुरास रेशमी किंवा जरी किनारीचे चंदेरीच्या तोडीचे दुपट्टे, धोतर जोडे, व इतर कपडे होतात. देवास संस्थानांत सारंगपूर यांत धोतरें, पातळें, व लुगडीं तयार होतात. हें कपडे विकण्याकरितां खुदरती पिंवळ्या रंगाच्या कापसाचें सूत काढतात. हा पिंवळा कापूस नानकिंग काटन या नांवानें इंग्रजी व्यापाऱ्यांत प्रसिद्ध आहे. ओर्छा गांवीं चांगलीं पागोटीं तयार होतात. ग्वालेर येथें चौकटीचा दोरवा विणतात.
 सुती कापडाबहुल मध्यप्रांताची पूर्वापार मोठी कीर्ति आहे. नागपूर, भंडारा व चंदा या तीन जिल्ह्यांत फार बारीक कापड निघतें, त्यांतही नागपूर जिल्ह्यांत उंबरेर आणि भंडारा जिल्हांत पावणी या दोन गांवांची विशेष प्रसिद्धि आहे. येथें फार बारीक सूत कांतितात. सन १८६७ साली झालेल्या नागपूर येथील प्रदर्शनांत चंदा यागांवीं तयार केलेलें एक सुताचें गुंडें पाठविलें होतें त्याचें वजन एक रत्तल असून लांबी ११७ मैल होती. सुताचा व्यापार करणारे काहीं इंग्रज लोक या गुंडीला इतकें मोहून गेले होते की, प्रदर्शनांतील कोणत्याही पदार्थास हात लाऊं नये अशा अर्थाच्या जाहिराती जिकडे तिकडे लाविल्या होत्या त्यांस न जुमानितां त्यांनीं त्यांतील तुकडे आश्चर्य कारक ह्मणून संग्रहीं