पान:देशी हुन्नर.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ ९ ]

"हीं चित्रं कधीं कधीं चमत्कारिक व कधीं कधीं मोठी विलक्षण असतात. परंतु त्यांत चित्ररेखनकौशल्य कांहींच नसतें. " या धंद्याच्या संबंधाने आमची अशी सूचना आहे कीं, आमच्या जिनगर व चितारी लोकांनी आपलीं मुलें चित्रशाळेंत पाठवून चित्ररेखन विद्या चांगली अवगत होण्यास विलायतेकडील साधनें उपयोगांत आणण्याचा यत्न करावा. तसबिरी रंगविण्याचा ज्यांचा धंदा आहे त्यांनीं फोटोग्राफचा उपयोग करावा, म्हणजे फोटोग्राफ पुढें ठेवून त्यांत नैसर्गिक प्रकाश ( लाइट ) आणि छाया (शेड) कसे उठलेले आहेत हें ध्यानांत आणून त्याप्रमाणें आपलें कलम चालवावे. इतकी मात्र गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे की, देशी चित्रें काढीत असतांना परदेशांतील वेलबुट्टीचा, इंग्रजी टेबलें, खुर्च्या, हंड्या, झुंबरे इत्यादिकांचा समावेश कधींही होऊं देऊं नये. असलें धेडगुजरी चित्र इंग्रज लोकांस किंवा कोणासही कधीही पसंत पडत नाहींं. ते त्याची नेहमीं थट्टा उडवीत असतात. चित्रांत रंग भरण्याच्या संबंधाने आमची अशी सूचना आहे की, हे रंग भडभडीत नसावेत. रंगाचे अन्योन्योद्दीपन (हारमनी आफ कलर्स ) म्हणून इंग्रजींत एक निराळे शास्त्रच आहे. त्यांत कोणत्या कोणत्या रंगाचा मेळ कसा कसा होतो व कोणता रंग कोणत्या रंगाच्या शेजारी असतांना सौरस्य भंग होतो हे दाखविलेलें असते. या कामांत आमचे लोक आलीकडे अतिशय गोंधळ करूं लागले आहेत. त्यांच्या रंगांत कधीही मेळ असत नाहींं. व कधीं कधीं त्यांनी काढलेल्या चित्रांकडे पाहूं लागलें तर डोळे दिपून जाऊन उलटा त्रास होतो.

खोदींव काम व शिळाछापाचें काम.
खोदींव काम.

 प्राचीन काळी खोदीव काम आपल्या देशांत होत असे परंतु ते वेगळ्या तऱ्हेचें; शिलालेख, ताम्रपट, शिक्के, मोर्तबें , छिटें, जाजमें, चुनड्या, वगैरे छापण्याकरितां तयार केलेले ठसे, इत्यादि. या शिवायही नकशीचे खोदींव काम पूर्वी होत असे, परंतु ते निराळ्याच प्रकारचें असल्यामुळे या सदराखालीं न देतां दुसरीकडे त्याचा उल्लेख केला आहे. हिंदुस्थानांत जुनाट असे शिलालेख ठिकठिकाणीं आहेत. परंतु त्यांतील अक्षरें वळणशुद्ध किंवा सुबक नाहीत. अलीकडे मोठमोठ्या इमारती, सार्वजनिक हौद, पूल, वगैरे लोकोपयोगी कामांवर जे शिलालेख दृष्टीस पडतात, ते पूर्वीच्या शिलालेखांपेक्षां अ-