पान:देशी हुन्नर.pdf/149

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १५१ ]

जिल्ह्यांत खारव्याच्या बदला गाद्या, उशा, गिरद्या, व तक्के याच कापडाचे असावेत अशी प्रतिष्ठित लोकांची समजूत आहे. या सर्व गोष्टींमुळें ठाणाक्लाथ बरेंच विकतें. आलीकडे या ठाणाक्लाथसारखें कापड विलायतेहून येऊं लागलें आहे. यास वेंगुर्ला ह्मणतात. येवलें, अमदाबाद, बडोदें, चाळीसगांव, पुणें व मुंबई या ठिकाणी पागोटीं विणण्याचे माग आहेत.
 पंजाबांत पूर्वी दिल्लीस मलमल फार चांगली होत असे. ही मलमल चिनी कापसाची करीत असत असें मेहेरबान बाडन साहेबांचें ह्मणणें आहे. लंडन येथील प्रदर्शनाकरितां सन १८८६ सालीं असली मलमल विकत मिळावी ह्मणून सरकारतर्फे पुष्कळ तपास झाला परंतु ती हल्लीं होत नाहीं असें कळलें. या बारीक मलमलीचीं पागोटीं हुश्शारपूर, सिरसा, जलंदर, लुधियाना, शहापूर, गुरुदासपूर, व पतियाला या गांवीं होतात, परंतु तीं पूर्वीसारखी खुमासदार निघत नाहींत. उत्तम मलमल सगळ्या पंजाब प्रांतांत रोहतक गांवीं होते. बारीक मलमलीस त्यां गांवीं तान्झेब म्हणतात, व तिचा उन्हाळ्याकरितां सदरे करण्याकडें उपयोग होतो. जलंदर गांवीं घाटी या नांवाचें चकचकीत पांढरें अंगरख्याचें कापड तयार होतें. विलायती लांगक्लाथ या देशांत येण्यापूर्वी याचाच उपयोग आमच्या अमीरउमरावांचे अंगरखे करण्याकडे होत असे. दोरव्याची मलमल चौखाना किंवा बुलबुलचषम हेही प्रकार पूर्वी पंजाबांत होत असत. हल्ली लुंगी, खेस, सुसी, दोसुती, गाऱ्हा आणि गझी (गिझनी) इतक्या प्रकारचें कापड पंजाबात होतें. लुंग्या मुख्यत्वेंकरून पेशावर येथें होतात व त्या इतर ठिकाणच्या लुंग्यापेक्षां मौल्यवान असतात. लुधियाना, गुगैरा, कोहात, लाहोर, व हुश्शारपूर, या गांवीही लुंग्या होतात. रंगारंगाच्या चौकटीच्या कापडास खेस म्हणतात याचा थंडीच्या दिवसांत पासोड्यांसारखा उपयोग होत असतो. खेस विणण्याकरितां सूत विलायतेहून आणावें लागतें, किंवा कधीं कधीं मुंबईच्या गिरण्यांमधून विकत आणावें लागते. सुशी या नांवानें प्रसिद्ध असलेल्या कापडाचें पंजाबांत बायकांकरितां पायजमे करितात. आतां दिसण्यांत सुसीसारखें कापड यंत्रावर छापून विलायतेहून इकडें येऊं लागलें आहे.
 मुजाफरगड, लाहोर, सियालकोट, फिरोजपूर, करनाळ, जंग, डेराइस्मायलखान, आणि पतियाला या गांवीं खेस तयार होतें. जलंदर, गुरुदासपूर, व सियालकोट या गांवीं सुसी हें कापड विणतात. लुधियाना गांवीं गबरूम