पान:देशी हुन्नर.pdf/140

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १३४ ]

पटकन् सांच्यावर टाकून पट्यानें कारागीर ती सारखी करतो, व ही कडीसाच्यावर बसवीत असतांना सांचा एका हातानें गरगर फिरवीत असतो. हें सर्व काम इतक्या चपळाईने होतें की, भट्टींतून कांच घेतल्यापासून तों बांगडी तयार होईपर्यंत अर्धे मिनिटसुद्धां लागत नाहीं. कांहीं कारणानें वेळ लागलाच तर कांच निवते व ती कडक होऊन जाते. त्यामुळें तिचा वेडा वांकडा आकार सुधरून घेण्याकरितां सांचा क्षणभर भट्टींत धरतात. बांगडी तयार झाली ह्मणजे सांच्यावरून जमिनीवर पाडतात. पुनः दुसरी बांगडी करण्याची सुरवात करण्यापूर्वी सळईचे टोंक तापवून ठोकून पुनः बारीक करावे लागतें. शिवापुरचे काचारी लोक तीन प्रकारच्या बांगड्या करितात. एकाला बांगडीच म्हणतात; दुसऱ्याला गोल असें नांव आहे; आणि तिसऱ्याला कौल किंवा कारला असें ह्मणतात. बांगडी आंतल्या बाजूस रुंद असून वर निमूळती असते. गोल वाटोळा असतो. आणि कौल किंवा कारला बांगडी सारखा निमूळता असून त्याच्यावर दांते असतात. याशिवाय असल्या तिन्ही प्रकारच्या आंगठ्याही तेथें होतात. काचारी लोक शिवापुराहून ह्या बांगड्या व आंगठ्या पुण्यास आणून बत्तीस रत्तलास सुमारें पांच रुपये या भावानें कासार लोकांस विकतात. परंतु हीच कांच कासार लोकांनीं त्यांस दिली असली तर मजुरी सुमारें तीन रुपये मिळते. शिवापुरच्या काचारी लोकांस सगळा दिवस मेहेनत करून काय ती चार किंवा पांचच आणे मजूरी मिळते.

 पुण्यांत मिस्तर शंकराव पाठकर यांनीं बिलोरी बांगड्या व कांचेची कांहीं भांडी तयार करून प्रदर्शनांत पाठविलीं आहेत. बडोद्यास रावसाहेब जगन्नाथ सदाशिवजी अजबा येथील तलावाच्या कामावरील मुख्याधिकारी यांनीं पुष्कळ मेहेनत घेऊन कांच तयार करण्याची सुरवात केली आहे. ही कांच पुष्कळ टणक व पांढरी सफेत होते. इतकी चांगली कांच आपल्या देशांत अजूनपर्यंत कधीं झाली नव्हती. रावसाहेब जगन्नाथजी यांचा स्तुत्य उद्योग, व श्रीमंत सयाजीराव महाराज सेनाखासखेल समशेर बहादर यांचा पूर्ण आश्रय, या चोहींचे सम्मीलन होऊन गायकवाडी राज्यांत कांचेचा कारखाना लवकरच सुरू होईल असें वाटतें. तशांत पुणें प्रदर्शन उघडण्याकरितां भरलेल्या जंगी दरबारांत नेक नामदार गव्हरनर साहेब लार्ड री यांनीं संभाषण केलें त्यांत हिंदुस्थान देशांत निदान काचेच्या बाटल्या तरी तयार होऊं नयेत हें मोठें आश्चर्य आहे, असें ह्मणून दाखविलें. ही गोष्ट आमचे स्वदेशाभिमानी पुर-