पान:देशी हुन्नर.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ ८ ]

काढलेल्या चित्रांसारखी ही चित्रे असतात. मोठ मोठे बादशाहा, प्रसिद्ध सरदार, ताजमहाल, व जुम्मा मशीद यासारख्या प्रसिद्ध इमारती ह्या अशा रीतीनें हस्तीदंतावर काढलेल्या असतात. हे चितारी लोक अलीकडे " फोटोग्राफ " पुढें ठेवून त्याजवरून हीं चित्रें काढूं लागले आहेत. यांचा उपयोग हस्तीदंताच्या पेटयांत बसविण्याकडे किंवा मडमांच्या गळ्यांत व हातांत दागिने करण्याकडे होतो. लाहोर येथील चित्रशाळेंतील मुख्याधिकारी मेहेरबान किप्लिंसाहेब असें म्हणतात कीं, “हिंदुस्थानांत फोटोग्राफ काढण्याची सुरुवात झाल्यापासून दिल्लीच्या हस्तीदंतावरील चित्रांत आस्ते आस्ते फरक पडत चालला आहे. कोणतीही तसबीर या चिताऱ्यांपुढें ठेविली तर ते ती पाहून हुबेहुब रंगाची तसबीर काढून देण्यास तयार असतात. व केव्हां केव्हां त्यांच्या रंगांत जरी कांही दोष असतात तरी एकंदरीनें त्यांचें काम आश्चर्य मानण्यासारखें असते. मार्दवपणाचा अभाव हा जो दिल्लीच्या चित्रांतील पूर्वापार दोष तो हल्लीं कमी होत चालला आहे. शास्त्रशुद्ध चित्ररेखन, चांगला रंग व नैसर्गिक देखावा या गोष्टींकडे लक्ष न देतां ते लोक अजून बारीक कलम मारण्याकडे विशेष लक्ष देतात. हें कलम एकाच केसाचें केलेलें असतें "

 दिल्लीचे मुसलमान कारागीर मुळचे इराणी आहेत, त्यांचे भाऊबंद हल्लीं मुंबई व कलकत्ता ह्या शहरीं जाऊन राहिले आहेत. बनारस व त्रिचनापल्ली या गावींही हस्तीदंतावर धर्मसंबंधी चित्रे काढणारे लोक आहेत. त्रिचनापल्लीस गोपाळरामराजे अशीं चित्रें काढतात. व जयपुरास कांही लोकांनीं हा धंदा आलिकडे सुरू केला आहे.

अभ्रकावरील चित्रें.

 हीं मुख्यत्वें करून त्रिचनापल्लीहूनच येतात. वेगवेगळ्या जातींच्या व धंद्याच्या लोकांची चित्रे यांजमध्ये असतात. बारा चित्रांस किंमत चार रुपयें पडते. बनारस येंथें कधी कधी अभ्रकावर काढलेली चित्रें तीनपासून सात रुपयेंं डझन पडतात.

चामड्यावर काढलेलीं चित्रें.

 मद्रास इलाख्यांतील कडपा जिल्ह्यांत नोसम गांवी साहेब लोकांच्या उपयोगाकरितां चामड्यावर रंगविलेली चित्रे अलिकडे काढीत असतात. मद्रासेंतील सर्व संग्रहालयावरील मुख्य अधिकारी डाक्तर बीडि यांचें असें म्हणणें आहे कीं