पान:देशी हुन्नर.pdf/138

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १३२ ]

पडतें. हें पाणी थंड झालें झणजे त्याचा गठ्ठा बनतो, तो फोडून त्याच्या बांगड्यां व लहान लहान कुप्या करितात. ठाणें जिल्ह्यांत चिंचणी गांवीं कांचेच्या बांगड्या होतात. त्यांच्या पोटांत तांबड्या, हिरव्या, व पिवळ्या रंगाचे नागमोडीसारखे पट्टे असतात. असल्या बांगड्यांस 'राणीचा बावटा' असें नांव दिलें आहे. पुणें जिल्ह्यांत शिवापुरास लिंगाईत काचारी लोकांचे बांगड्या करण्याचे चार कारखाने आहेत. त्यांत सुमारें पंचवीस पासून तीस कामगार काम करीत आहेत. ते आपण सोलापूर जिल्ह्यांतून पांच सात पिढ्यांपूर्वी आलों असें ह्मणतात. चिनई बांगड्याच्या कांचा " कांच बांगडी फुटाणे" वाल्याकडून विकत घेऊन हे लोक त्याच्याच बांगड्या करितात. ह्या 'कांचबांगडी फुटाणे' वाल्या मारवाड्यांची पुणें शहरीं भवानी व वेताळ पेठांत दुकाने आहेत. हे लोक चणें फुटाणें घेऊन सगळ्या गांवभर फिरतात. व बांगडी विकणाऱ्या कासार लोकांकडून कांचा गोळा करितात. शिवापूर येथील काचारी निजामशाहीतील गुंतूर व खेडा जिल्ह्यांतील कपडवंज येथन पूर्वी कांच आणीत असत.

 ह्या काचारी लोकांचीं हत्यारें अगदींच साधीं आहेत:--(१) बांबूच्या लहान लहान पांच सहा टोपल्या शेणानें सारवून सुकवून ठेवितात. ह्या टोपल्या फुटक्या बांगड च्या कांचा ठेवण्यास उपयोगीं पडतात. (२) लोखंडाच्या करंगळीपेक्षां सुद्धां बारीक दोन फूट लांबीच्या एका बाजूस बारीक टोंक असलेल्या निमुळत्या सहा सळया. (३) मातीच्या सुपल्यांच्या आकाराच्या सात आठ मुशी. (४) मात्रा किंवा सांचा ह्मणजे मातीचा गोळा एका टोंकावर बसविलेली सळई, ह्या सळईचें एक टोंक एका जमिनींत मारलेल्या उभ्या खुंटीवर असलेल्या कोयड्यांत अडकविलेलें असतें, व दुसरें टोंक एका दगडावर ठेवलेलें असते. (५) लोखंडाचे कागद कापावयाच्या कात्रीच्या आकाराचे सहा इंच लांबीचे पांच सहा तुकडे, त्यांस पट्टे ह्मणतात. (६) आंकडी ह्मणजे लांकडाच्या मुटींत बसविलेली व टोकाशी जरा वांकविलेली एक सळई. (७) लाकडाच्या मुठीत बसविलेल्या सात आठ "चाती " ह्मणजे सुमारें सहा इंच लांबीचे खिळे. (८) सात आठ लहान लहान हातोडे. (९) पांच साहा मातीच्या कुंडया. (१०) एक बुरडी व ओबडधोबड तराजू, (११) कांहीं वजनें अथवा वजनाप्रमाणें उपयोगांत आणलेले दगड. (१२) व पांच सहा लोखंडाच्या पळ्या.