पान:देशी हुन्नर.pdf/137

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १३१ ]

काळीं स्फटिक कुटून त्याचीच कांच करीत असत. स्फटिकाचीं भांडीं वगैरे करितांना शिल्लक राहिलेल्या तुकड्यांचा अशा रीतीनें उपयोग होत असे. परंतु अर्वाचीन काळीं जमिनींत एका प्रकारचा पापडखार सांपडतो त्यापासून कांच करितात. या पापडखारास गुजराथेंत खारो किंवा ऊस असें ह्मणतात. व उत्तर हिंदुस्थानांत रे असें ह्मणतात. आपल्या देंशांत होत असलेली कांच अगदींच हलकी असते. तिच्यांत बुडबुडे असतात, व ती लवकर फुटते. कांच करण्याची कृति अगदीं सोपी आहे. खारी माती किंवा ऊस भट्टींत घालून पुष्कळ आंच लावून वितळविली ह्मणजे झालें. प्लिनी नांवाच्या ग्रीक देशांतील ग्रंथकारानेंही असें लिहून ठेविलें आहे कीं, ग्रीस देशांत एका प्रकारची माती भाजून तिची कांच करीत असत. आपल्या देशांत देशी कांचेच्या बांगड्या, मणी, व अत्तराच्या कुप्या करितात. रोम शहरांत व्हॉटिकन या नावाचा एक मोठा वाडा आहे; त्यांतील संग्रहालय पाहाण्यास आह्मीं गेलों होतों तेव्हां तेथें ग्रीस देशांतील प्राचीन काळचीं कांहीं कांचेची भांडी पाहिलीं तीं व हल्लीं खेडा जिल्ह्यांत कपडवंज येथे होत असलेलीं भांडीं, केवळ रंगानेंच नाहीं तर आकारानें सुद्धा फारच साम्यता पावतात असें आमच्या नजरेस आलें. कपडवंज गुजराथेंत आहे, व गुजराथी लोकांचा आमच्या देशांत कौशल्यांत पहिला नंबर आहे. त्यांचें निरालस्य, व कौशल्य, हीं ग्रीक लोकांच्या स्वभावशीं मिळतीं आहेत तेव्हां त्यांचे पूर्वज ग्रीस देशाहून येथें आले ह्मणा किंवा येथून ग्रीस देशांत गेले ह्मणा, कांहीं तरी शरीरसंबंध असावा ह्यांत शंका नाही.

 आमच्या देशांत हल्लीं कांचेचें काम विलायतेहून आगबोटीच्या आगबोटी भरून येत आहे. मुंबई इलाख्यांत कांच फारच ठिकाणीं तयार होते. खेडा जिल्ह्यांतील कपडवंज येथें होणारी कांच, व्हेनीस शहरांत प्राचीन काळीं होत असलेल्या कांचेप्रमाणे दिसते. या गांवीं कांच करणारे सर्व लोक जातीचे मुसलमान असून त्यांची संख्या सुमारें साठ पासून सत्तर आहे. ते दरिद्री असून कर्जबाजारी आहेत. “ ऊस" या नांवाची खारीमाती, साजीखार, व जयपूर येथील रेती हीं भाजून त्यांची कांच करितात. मातीच्या लहान सुपल्या करून त्यांत हे पदार्थ घालून भट्टींत ठेवितात. भट्टी पेटली ह्मणजे कांहीं वेळांनीं त्या मिश्रणाचें पाणी होऊन तें भट्टींत केलेल्या खळग्यांत जाऊन