पान:देशी हुन्नर.pdf/136

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १३० ]

गापट्टण; उत्तरआर्काट जिल्ह्यांत गुडियाटम, सालेम, अनंतपूर, उपिनंगड; दक्षिणकानडा, कृष्णा, त्रिचनापल्ली, मलबार, गोदावरी, व तंजावर, या सर्व गांवीं कमजास्त भावानें मातीचीं भांडीं होतात.

 कूर्गप्रांतीं विलायती तऱ्हेच्या बरण्या होतात. मरकारा येथें यूरोपियन लोकांनीं काढिलेली एक भट्टी आहे.
 ब्रह्मदेशांत मातीचीं साधीं भांडीं होतात तेथें खारें पाणी मडक्यांत घालून त्याचें मीठ करण्याची चाल आहे. शेग्विन्, रंगून, मौलमीन, व इतर ठिकाणीं हीं मातीचीं भांडीं होतात. " पेगूजास " या नांवानें साहेब लोकांत प्रसिद्ध असलेलीं मातीचीं भांडीं त्वंत्त गांवाहून येतात. बसीन गांवीं होत असलेल्या चिनई भांड्याचे खालीं दिलेलें वर्णन मेहेरबान टिली साहेबांच्या पुस्तकांतून घेतलें आहे.

 "मातीची मडकीं करण्याची वेळ नोव्हेंबर पासून मे महिन्या पर्यंत आहे. दोन भाग माती, व एक भाग समुद्रातील बारीक रेती घेऊन तिच्यांत पाणी घालून कुटतात. नंतर तीतींल एक गोळा घेऊन त्याचा वरवंट्याच्या आकाराचा गोळा करून चाकावर ठेवून तें फिरवितात. चाक फिरत असतांना, भांड्याला आकार देतात. नंतर एक दिवस पर्यंत भांडीं सुकत ठेवून त्यांज वर शिशाची अशुद्ध धातू व भाताची पेज एकत्र करून तिचें पूट देतात. पूट दिल्यावर भांडें लागलेंच भट्टीत घालून तीन दिवस पर्यंत जळत ठेवितात."


प्रकरण ११ वें.
कांच.

 प्राचीन काळीं आपल्या देशांत कांच माहीत होती. यजुर्वेद लिहिला त्यावेळीं ह्मणजे येशूख्रिस्ताच्या पूर्वी ८०१ व्या वर्षी आमच्या देशांतील स्त्रिया कांचेच्या बांगड्या घालीत असत. महाभारतांत व युक्तिकल्पतरू या नांवाच्या ग्रंथांत असें लिहिलें आहे कीं कांचेच्या प्याल्यानें पाणी प्यालें असतां स्फटिकाच्या प्याल्यानें पाणी प्याल्याचें श्रेय लागतें. डाक्टर राजेंद्र लालमित्र यांचें ह्मणणें असें आहे कीं, प्राचीन