पान:देशी हुन्नर.pdf/126

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १२० ]

आहे. त्यांची अशी समजूत आहे कीं सुलैमान याचें तक्त विमानाप्रमाणें आकाशांतून उडत जात असतां नर्मदा नदी ओलांडून जातानां त्यांतील कांहीं मणी या नदींत पडले, ते हे होत.

 जयपूर संस्थानांत राजमहाल शहराजवळ बनास नांवाच्या नदींत याकूत या नांवाचा एक लालडीसारखा दगड सांपडतो. हाच दगड उदेपूर व कृष्णगड ह्याही संस्थानांत कोठें कोठें मिळतो. अभ्रकाचे व संखजिऱ्याच्या एका जातीचे दगड सांपडतात ते फोडले ह्मणजे त्यांतून बारा पैलू असलेले याकूत आढळतात. त्यांचा रंग पिवळ्या रंगापासून लाल व जांभळा असतो. जांभळ्या रंगाचा याकूत उत्तमांत गणला आहे.

 हे दगड पेगू व सिरीयम येथें सांपडणाऱ्या दगडासारखे असतात. प्लिनी नांवाच्या एका ग्रंथकारानें असें लिहून ठेविलें आहे कीं हिंदुस्थानांतील याकूत दगड फार मोठाले असतात, व त्यांत बारा औंस पाणी ठेवितां येते. इतका मोठा दगड जयपूर संस्थानांत हल्लीं कोठें आढळत नाहीं. मोठ्यांत मोठा ह्मणजे पांच सव्वापांच तोळे वजनाचा मिळतो. दगड गोळा केले ह्मणजे राजमहालास साठेकरीलोक ते विकत घेतात,अथवा जयपूर येथें पाठवून सारवार नांवाच्या लोकांस विकतात. आमसुलाच्या ओल्या फळाचीं दोन टरफलें केलीं ह्मणजे ती जशी बाहेरून लिंबा प्रमाणें गोल व आंतून वाटी प्रमाणें खोलगट दिसतात त्या तऱ्हेवर याकूत मोठा असला ह्मणजे त्यास कापतात व तो स्वित्झर्लंड जर्मनी, इंग्लड, इटली व आस्ट्रिया या देशांत पाठवितात. तेथें तो पुन्हा कापिला जाऊन त्याचे दागिने होतात. घड्याळें करण्याच्या कामीं ह्या दगडाचा उपयोग करितात. जयपुरास सहा आण्यापासून दिडरुपया रतल या भावानें कच्चा दगड विकतो. पक्या ह्मणजे, कांपलेल्या दगडास पांच पासून पाऊणशें रुपये रतल भाव येतो.

 जयपुरास याकुताचे लोलक व गोखरूदार मणी करून त्याच्या माळा तयार करितात. हल्लीं जयपूरची इतकी कीर्ति पसरली आहे कीं इतर गांवच्या लोकांस आपला माल नेऊन तेथें विकावा लागतो. जयपूरच्या महाराजानीं यंदाच्यासालीं ग्लासगो येथील प्रदर्शनांत असला माल दहाहजार रुपये किंमतांचा पाठविला आहे.

 बंगाल्यांत मणीकाराचें काम नांव घेण्यासारखें कोठेंच होत नाहीं.