पान:देशी हुन्नर.pdf/125

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ११९ ]

डौलाचे असतात. अनेक तऱ्हेचे ताईतही अरबस्थानांत विकतात. युरोपियन लोकांकरितां गाड्यावर बसविलेले तोफेचे नमुने, पेट्या करण्याकरितां सपाट चौकोनी तुकडे, चहाचे प्याले व बशा, बुद्धिबळें, फूलदानें, लेखण्या, घड्याळें, किंवा कागद ठेवण्याच्या चौकटी, दौती, चाकूच्या मुठी, आखण्या, कागद कापण्याच्या सुऱ्या, टांकाच्या दांड्या, मडमांच्या गळ्यांत घालण्याकरितां माळा व ब्रोच, हातांत घालण्याकरितां कांकणे, कागदावर ठेवण्याचीं वजने, लोंकरी काम करण्याच्या सळया, रेशीम गुंडाळण्याच्या फिरक्या, बुतामें, शिक, इत्यादि पदार्थ तयार होत असतात. गेल्या ३८ वर्षांत ह्मणजे १८५१ पासून अरबस्थानांत माल जावयाचा तो काठेवाड प्रांताच्या नैऋत्येस असलेल्या विरावळ बंदरापासून जातो. हल्लीं बहुतकरून सर्व माल बोहरी लोक मुंबईस आणतात. व तेथूस चीन, अरबस्थान, व यूरोप या ठिकाणीं रवाना करितात. क्वचित् सिंध, काबूल व अरबस्थान येथील घोड्याचे व्यापारी खंबायतेस येतात तेव्हां तेही कांहीं माल आपल्या देशास घेऊन जातात."

 मणीकार लोक आपल्या देशांत ठिकठिकाणीं सांपडतात. वायव्य प्रांतांत बांडा जिल्ह्यांत केण नदींत अकीक सांपडतात. त्यांचे साहेब लोकांकरितां नग करीत असतात. आग्रा व लखनौ या गांवीं शिक्के मोर्तब खोदण्याचें काम चांगलें होतें.

 पंजाबांत भेरा येथें खोट्या दगडाचे मणी वगैरे तयार होतात. हा दगड कंदाहाराजवळ सांपडतो, तो तेथून बकऱ्याच्या कातड्याच्या पिशवींत घालून वाफ्यावर ठेवून सिंधू नदींत सोडून अटक गांवीं आणितात. व अटक गांवांतून भेरा येथें नेतात. भेरा येथें इमामउद्दीन, महंमदद्दीन व खुदाबक्ष असे तीन मणीकार प्रसिद्ध आहेत. अमृतसर येथें काही काश्मीरीलोक मणीकाराचें काम करितात. लाहारे व दिल्ली या गांवींही मणीकार आहेत.
 जबलपूर येथें गारेचे मणी होतात, व नर्मदेंत सांपडलेल्या कांहीं दगडाच्या चाकूच्या मुठी, कागद कापावयाच्या सुऱ्या, बुतावें वगैरे जिनसा होतात. ह्या नर्मदेंत दाणासुलैमानी नांवाचा एक दगड सांपडतो. हा एका जलचराच्या डोक्याच्या हाडापासून बनतो. हाडें हजारों वर्षे चिखलांत पुरून राहिल्यामुळें त्याच्यावर एका प्रकारचा रसायन प्रयोग घडून त्याचा दगड होतो, तरी त्याच्या आकारांत फारसा फरक पडत नाहीं. मुसनमान लोकांत या मण्यास फार मान