पान:देशी हुन्नर.pdf/124

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ११८ ]

व क्षुद्र कीटक यांचे रज असल्यामुळें पिवळे डाग दिसतात. हा दगड कच्छच्या रणांत डिसा शहराच्या उत्तरेस साठ मैलांवर धोकवाडा या गांवीं सांपडतो. ह्याचे मोठाले चिरे असतात, तरी त्यांजवर चांगली झील देतां येत नाहीं. खंबायती स्फटिकही मौर्वी संस्थानांत टंकारा येथेंच सांपडतात. ते पांढरे सफेत असल्यामुळें त्यांजवर झीलही चांगली चढते. मद्रास, लंका (सिलोन ), आणि चीन येथून स्फटिक आणून त्यांसही खंबायत शहरीं पैलू पाडून खंबायती स्फटिक या नांवानें विकितात. नीलोत्पल याला व्यापारी लोक लाजवर्द असें ह्मणतात. हा दगड इराण व बखारा येथून मुंबईच्या द्वारें खंबायतेस येतो.याजवरही चांगली झील देतां येत नाहीं, काळा पथ्थर या नांवाचा एक दगड बसोरा व एडन यथून येतो,व खंबायतेस येतो त्याजवर पैलू पडतात.हा दगड फूटलेल्या कांचेप्रमाणें दिसतो, परंतु त्याजवर झील फारच उत्तम तऱ्हेनें देतां येते. हल्लीं खंबायतेस पिरोजा नांवानें विकत असलेला दगड खरा पिरोजा नाहीं. हा कांहीं तरी रांधा आहे. तो चीन देशाहून येतो. याचे तुकडे सुमारें वजनानें अर्धाअर्धा रतल भरतात. हा दगड किंवा रांधा निळ्या कांचेसारखा दिसतो, परंतु त्याजवर झील फार चांगली बसते.

 दगड खाणींतून गोळाकरून आणिला ह्मणजे त्याजवर तीन प्रयोग घडतात. एक तो कापण्याचा; दुसरा छीणीनें त्यास आकार द्यावयाचा, आणि तिसरा झील चंढवावयाचा. खंबायतसे होणाऱ्या दगडाच्या दागिन्याचेही तीन प्रकार आहेत. एक चिनी लोकांचे दागिनें; दुसरा अरबी लोकांचे दागिनें; व तिसरा युरोपियन लोकांचे दागिनें. चिनई लोकांचे दागिनें रात्या दगडाचे करितात. त्यांत दोन प्रकार आहेत, एक पदकें, त्यांस मुगलाई गुल ह्मणतात; आणि दुसरे मणी, त्यास डोल म्हणतात. पदकें चपटीं, पातळ, बदामी किंवा चौकोनी रंगाचीं असतात. तीं चीन देशांत पोंचीप्रमाणें वापरतात किंवा कपड्यांवर बसवितात. मण्याच्या माळा करितात. प्रत्येक माळेंत ५० मणी असतात. अरबस्थानांत पाठविण्याकरितां रामपूर येथील अकीक, रतनपूर येथील राता व लसनी दगड, व लाल छाटदार दगड, यांचा उपयोग होतो. यांच्या आंगठ्या, आंगठ्याचे खडे, गळ्यांतील माळा, हातांतील कांकणें, बाजूबंद वगैरे जिनसा होतात. अरबस्थानांत पाठविण्याकरितां तयार केलेले मणी पैलूदार किंवा गोखणदार म्हणजे हिऱ्या सारखे, व बदामी आकाराचे व भाल्याच्या टोंकाच्या आकारा सारखे ह्मणजे " चमकळी"