पान:देशी हुन्नर.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[५]

कांहींच मेळ नसतो. उत्तरहिंदुस्थानांतील सरळ रेखाकृतीची मुसलमानी तऱ्हेवर काढलेलीं चित्रें दिसण्यांत बरीच सुंदर दिसतात. मुंबई, मद्रास, व बंगाल ह्या तीन प्रांतांत देवळांत चित्रेंं काढण्याची रीत आहे. पूर्वी ही चित्रेंं काढण्यास लागणारे रंग, गेरू, पेवडी इत्यादि देशी जिनसांचे केलेले असत. परंतु हल्लींं विलायती रंग येऊ लागल्यामुळे आमच्या देशांतील रंगांचा उपयोग फारच क्वचित् होतो. ज्याप्रमाणें विलायतेहून रंगाच्या पुड्या तयार होऊन येतात त्याप्रमाणे आपल्या देशांत तयार करून विकण्याची कोणी व्यापाऱ्यानें सुरवात केल्यास त्यांत त्यास पैसा मिळेल असें आह्मांस वाटतें.

रोगणीं चित्रें.

रोगणीं ह्मणजे तेलांत कालवून तयार केलेल्या रंगाने रंगविलेलीं चित्रेंं. ही विद्या आपल्या देशांत नव्हती, ती इंग्रज सरकारानें सुरू केली. या कामांत लागणारे रंग तयार करण्यास लागणारे आळशीचें तेल आमच्याच देशांतून विलायतेस जातें, किंवा आळशी येथूनच जाऊन तिकडे तिचें तेल निघून पुनः आमच्या देशांत परत येतें. ही गोष्ट आमच्या व्यापाऱ्यांनी लक्षांत ठेवण्याजोगी आहे. सरकारीचित्रशाळेंतून शिकून तयार झालेली कांही मुलें “ऑइल पेन्टिंग" तयार करतात. त्यांस उत्तेजन देण्याकरितां व आपल्या देशांत या विद्येची वृद्धि व्हावी ह्या हेतूनें आमचे राजेरजवाडे व श्रीमंत लोक आपल्या वाडवडिलांच्या तसबिरी काढवून ठेवण्याची चाल सुरू करतील तर फार बरें होईल. युरोप व अमेरिकाखंडांत ही चाल सर्वठिकाणीं आहे.

साधीं व लाखेच्या रंगाचीं चित्रें.

 कागदावर, कापडावर, कांचेवर किंवा लांकडावर रंगारंगाची चित्रें काढणें, व त्यांजवर लाखेचें पांणी देऊन ह्मणजे तीं ऊन केलेल्या लाखेनें सारवून तयार करण्याची चाल आमच्या देशात पूर्वापार आहे. सांगली, जगन्नाथ व मद्रास येथें तयार होणारे चित्रपट, सांवतवाडीस होणाऱ्या करंड्या, रोवळ्या व सुपल्या आणि सांवतवाडी व सिंध येथें तयार होत असलेले लाखेचें लांकडी सामान हीं या सदराखाली येतात. जगन्नाथास अशी चाल आहे कीं एक कापडाचा लांब तुकडा घेऊन तो शेणमातीनें सारवावा व त्याजवर पुराणप्रसिद्ध पुरुषांचीं