पान:देशी हुन्नर.pdf/106

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १०० ]

रींव कामाचा ऱ्हास होत चालला होता,व फूलदानें आणि आरशांच्या चौकटी या शिवाय विशेष कांहीं काम होत नव्हतें, परंतु थोड्या वर्षापूर्वी अमेरिकेंतून फारेष्ट साहेब या नांवाचे गृहस्थ तेथें आले, तेव्हां त्यांनीं चार हजार रुपयांस ज्याजवर पुष्कळ नक्षी आहे असें एक घर खरेदी केलें व तें पाडून आपल्या देशांत पाठवून दिलें. हें घर अमेरिकेंत गेल्यावर तेथें जाहिराती दाखल लावून ठेविलें व अमदाबाद शहरीं शेट मगनभाई हत्तीसिंग यास आपले एजंट नेमून त्या जवळ एकलाख रुपये अमानत ठेविले. शेट मगनभाई हे त्या शहरांतील एका मोठ्या श्रीमान व वजनदार व्यापाऱ्याचे चिरंजीव आहेत. यांनी हल्लीं सुमारें साठपासून ऐंशी सुतार नोकरीस ठेवून एक कारखाना काढिला आहे. त्यांत अमदाबाद, कडी, पट्टण, व सुरत या चार गांवचे कारागीर आहेत. या सर्वांत पट्टण येथील लोक फार हुषार आहेत असें शेट मगनभाई यांनी आह्मास सांगितलें. या लोकांनी तयार केलेलें काम अमेरिकेंत गेलें ह्मणजे त्याची किंमत फारेष्ट साहेब पाठवून देतात त्यामुळें एकलाख रुपयाची रकम या कारखान्यांत नेहमीं खेळती रहाते. बडोदे येथें हल्लीं बांधीत असलेल्या राजवाड्याकरितांही अमदाबादेहूनच काम तयार होऊन जात आहे.

 बडोदें संस्थानांत बिलिमोरा ह्मणून एक गांव आहे तेथें खोंदीव कामाच्या चंदनाच्या पेट्या तयार करणारी पंधरापासून वीस पारशी कुटुंबें आहेत. त्यांत मिस्तर सोराबजी जामासजी हे मुख्य असून तेच पुणें प्रदर्शनांत माल घेऊन आले आहे. सुरतेस घरे बांधण्याकरितां दरवाजे, खिडक्या, झरोके, घराच्या चौकटी, गणेश पट्या, व छतपट्या, इत्यादि सामान तयार होत असतेंं. ही नक्षी ठळक असून मोठी सुरेख असते, याशिवाय चंदनाच्या पेटया जनावरांची व पांखराचीं चित्रें, व इतर खेळणीं हीं ही सुरतेस फार होतात. सुरतेंतील कारागिरांत मूळचंद काशीरामाची विशेष प्रसिद्धी आहे. त्याचें काम इतर लोकांच्या कामापेक्षां फारच सुरेख असतें. मूळचंद काशीराम हा स्वतः आपलें काम घेऊन पुणें प्रदर्शनांत आला आहे. आमच्या नाशीक शहराकडे पाहिलें ह्मणजे त्या गांवीं पूर्वी लांकडावरील खोंदीव काम फार उत्तम प्रकारचें होत असे, अशी आपली खात्री होते. परंतु सन १८८३ सालीं त्या शहरीं मेहेरबान ग्रिफिथ्स साहेबांबरोबर आम्हीं गेलों होतों, तेव्हां पुष्कळ तपास केला तरी काय तो एकच कारागीर सांपडला. हा कारागीर तेथील पेशव्यांच्या वाड्यावर ज्या सुताराच्या हातची नक्षी आहे त्याचा वंशज आहे. याजकडून पेश-