पान:देशी हुन्नर.pdf/105

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ९९ ]

त्याजवर जडावांत सोनें, याकूत, प्रवाळ, वैडूर्य (नीलोपल) व त्याजवर तांंबडा चांदवा व त्याचें आसन, हात, व पाठ, याजवर हत्तीच्या ओळी व पावक्याला हत्तीचीं गंडस्थळें असली ह्मणजे त्यास गजसिंहासन ह्मणत. याचप्रमाणें त्याजवरील हंसाच्या चित्रावरून हंस सिंहासनास त्याचें नांव प्राप्त झालें. तें साल या लाकडाचें करीत व त्याजवर चुन्याच्या कोंदणांत पुष्कराज व अकीक हे बसवीत असत आणि त्यांचा चांदवा पिवळ्या रंगाचा असे. चांदव्याच्या दांड्या पुतळ्या सह असून एकवीस असत. गजसिंहासन चंदनाचेही करीत असत. व त्याजवर सोन्याच्या कोंदणांत हिरे व मोत्याचे शिंपे बसवीत. त्याजवरील चांदवा पांढरा असे. चांदव्याच्या दांड्या एकवीस असत. घटसिंहासन सोनचाफ्याच्या लांकडाचें करीत, त्याजवर नक्षी सोन्याची किंवा पाचूची करीत, व त्याजवर घट कोरुन काढीत असत. पावके कमळाच्या कळ्याच्या आकाराचे केलेले असत. चांदव्याच्या दांड्या २२ असून त्याजवरील कापड निळ्या रंगाचें असे. निंबाऱ्याच्या लांकडाचें सिंहासन करून त्याजवर हरणांची चित्रे खोंदून व पावके हरणांच्या डोक्याच्या आकाराचे करून त्याजवर सोनें व पाच बसविली ह्मणजे त्यास मृग सिंहासन ह्मणत, याजवरीलही चांदवा निळ्या रंगाचा असे. हरिद्रा नांवाच्या लाकडाचें राजासन करून त्याजवर सोनें व नवरत्नें बसवून त्यांत घोडयाची चित्रें खोंदून त्याचे पावकें घोड्याच्या आकाराचे करून त्याजवर चित्रविचित्र रंगाचा चांदवा चढविला, ह्मणजे त्यास हयसिंहासन म्हणत. याच्या चांदव्यास ७४ दांड्या असत.

 कोंच, खुर्चि, बांक, तिवई, ह्याही जिनसा प्राचीन काळी होत असत. यांच्या पावक्यांची टोंकें सिंहाच्या पंजांप्रमाणें किंवा गरुडाच्या नख्यांप्रमाणे होती. ज्यांच्या हाताच्या व दांडयाच्या टोकांस मगरीचें तोंड खोदीत त्यांस मकरमुख ह्मणत.

लांकडावरील अर्वाचीन खोंदीव काम.

 प्रस्तुतकाळीं पलंग, तक्तपोश व चौरंग या जिनसा तयार होत असतात. विलायती धरतीचे सामान तर पुष्कळच होऊं लागलें आहे.

 मुंबई इलाख्यांत अमदाबाद, पट्टण, बडोदें सुरत, मुंबई व कुमठा या ठिकाणीं पुष्कळ खोंदीव काम होतें. अमदाबादेस खोंदीव काम करणाऱ्या लोकांची सुमारें ८०० घराणीं आहेत. या आमदाबाद शहरीं लाकडावरील को-