पान:देशी हुन्नर.pdf/104

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ९८ ]

डामडौलानें राहात नसत त्यामुळें खोदून नक्षी केलेल्या लांकडी जिनसांची फारशी जरूर लागत नसे. तत्रापि सुताराची गणना गांवपंचांत होऊन त्यास बराच मान मिळे. त्याला सूत्रधार ह्मणत आणि तो युद्धप्रसंगाकारतां रथ तयार करीत असे इतकेंच नाहीं, तर सारथ्याचेही काम त्याच्याचकडे असे. ऋग्वेदांत सुताराबद्दल उल्लेख आहे; आणि मनूनें आपल्या संहितेत त्यांची एक वेगळी जातच मानिली आहे. रथाशिवाय पलंग, सिंहासन. पाटव्यासपीठ, देव्हारे इत्यादि पदार्थही सुतार लोक करीत. बृहत्संहितेंत व शिल्प शास्त्रांत झाड केव्हां तोडावें, कसें तोडावें, व लांकूड सुकवून तयार कसें करावें, व त्याच्या जिनसा कशा तयार कराव्या, हें सांगितलें आहे. पलंगाचे गाते खोंदून त्याजवर नक्षी काढण्याची चाल असे, व त्यांस कधीं कधीं सिंहाचाही आकार देत. कधीं कधीं त्यांजवर हस्तिदंत, सोनें, व रत्नें ही कोदणें खोंदून बसवीत असत. सिंहासनें पुष्कळ तऱ्हेची करीत. डाक्टर राजेंद्रलाल मित्र यांच्या “इंडो आरयन्स" नावांच्या पुस्तकांतून खालीं लिहिलेला मजकूर घेतला आहे. सिंहासनाच्या पावक्यांवर सिंहाचीं चित्रें काढीत असत, ह्मणून त्यांस हें नांव पडलें असावें. परंतु सिंहासन ह्मणजे राजाची बसण्याची जागा ह्या अर्थानें त्याची प्रसिद्धी होऊं लागल्यापासून त्याच्या नांवांतही फरक पडूं लागला. पद्मसिंहासन ह्मणजे कमळाच्या आकाराची राजास बसण्याची जागा असा अर्थझाला, मग त्यास सिंहच पाहिजेत असें नाहीं.गजसिंहासन ह्मणजे हत्तीच्या आकाराचे पावके ज्यास आहेत असे.राजासन सिंहासनाच्या पावक्यांवर कमळें, शंख, हत्ती, हंस, सिंह, घट, हरिणें व घोडे यांचीं चित्रें काढीत असत. व या पायाच्या नक्षीवरून सिंहासनास नांव देत. संभार नांवाच्या लांकडाचे आसन करून त्याजवर सोन्याची नक्षी करून त्यांत माणकें बसवून गलथ्यावर कमळें खोंदून काढून पावक्यांच्या जागीं कमळाच्या कळ्या खोंदलेल्या असल्या ह्मणजे, त्यास पद्मसिंहासन ह्मणत. तांबड्या कापडाचा त्याजवर चांदवा असून त्याच्या आठही दांड्याखाली बारा बारा बोटें उंचीचे मनुष्याचें चित्र असे. याच लांकडाचे राजासन करून त्याजवर चांदीची व स्फाटकांची नक्षी केलेली असली, त्याचा चांदवा पांढऱ्या रंगाचा असला, आणि त्याजवर व पावक्यांवर शंखाची आकृति कोरलेली असली, ह्मणजे त्यास शंखसिंहासन ह्मणत असत. त्याच्या भोंवती चांदव्याच्या दांड्या सत्तावीस असत, व त्यांजवरही माणसाचे पुतळे खोदीत. फणसाच्या लांकडाचें राजासन करून