पान:देशी हुन्नर.pdf/102

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ९६ ]

टुंबें आहेत. कांचनगड गांवीं प्रेमचंद मिस्त्री या नांवाचा एक मनुष्य विलायतच्या तोडीचें काम करितो. सिकिम येथें हाडाच्या किंवा चांदीच्या मुठीचे चाकू होतात. नडियाद जिल्ह्यांत सेनहाद गांवीं खाटकाच्या सुऱ्या व विळे तयार होतात. चाकूच्या व सुऱ्याच्या मुठी पाटणा येथें चांगल्या होतात. सारण जिल्ह्यांत हाजीपूर येथेंही ह्या जिनसा होतात. याच जिल्ह्यांतील लवापूर येथील खेड्यांतील एका विहिरीचें पाणी चाकू कात्रीवर पाणी देण्यास फार उपयोगी पडतें, अशी समजूत आहे. परंतु त्याचा अर्थ इतकाच की तेथें कोणी तरी हुषार शिकलगार आहे. दिनापूर येथील आडकित्ते चांगले आहेत असें बंगाली लोक मानितात. खान्द्रा या नावांने प्रसिद्ध असलेली एका प्रकारची तलवार रंगपूर येथें होते. तिचा उपयोग बंगाली लोक बळी मारण्याकडे करितात. सांबराच्या शिंगाच्या मुठीच्या साहेब लोकांस जेवतांना उपयोगी पडणाऱ्या सुऱ्या राची येथें होतात.

 मद्रास इलाख्यांत सालेम गांवीं एक घराणें चाकू, सुऱ्या, व भाले, करण्यांत प्रसिद्ध आहे. कृष्णा व मलबार येथें ही असला माल तयार होतो.

तारकशी काम.

 तारकशी लोकांचें काम ज्या ज्या गांवीं मुसलमान राज्यकर्ते किंवा अमीर उमराव रहात असत त्या त्या सर्व गांवीं होत असतें. दिल्ली, बनारस, अमदाबाद, सुरत, दक्षिण हैद्राबाद, सिंध हैद्राबाद, कराची, सिकारपूर, औरंगाबाद, ही सर्व गावें तारकशी काम व कलाबतु, याबद्दल प्रसिद्ध आहेत. मुसलमान लोकांस किनखाप, व कलाबतूनें केलेलें कशिद्याचे काम वापरण्याची आवड फार, त्यामुळे त्यांच्याच आश्रयानें हा हुन्नर वृद्धिंगत झाला आहे. कलाबतू व किनखाप हे दोन्ही शब्दही त्यांच्याच भाषेंतील आहेत. हल्लीं पुणें, येवलें, व मुंबई, या तीन गांवीं तारकशी काम पुष्कळ होत असतें. परंतु येथील बहुतेक कारागीर औरंगाबाद व पैठण येथून आले आहेत. हल्लीं विलायतेंहून यंत्रांत तयार झालेली कलाबतु येऊं लागली आहे, त्यामुळें आस्ते आस्ते हा धंदा बसत जाईल असा सुमार आहे. मुंबईत मात्र दाऊतभाई मुसाभाई या नांवाच्या एका प्रसिद्ध व्यापाऱ्यानें कांहीं यंत्रें हिंदुस्थानांतच तयार करून त्यांजवर कलाबतु तयार करण्याचा कारखाना काढिला आहे. ही यंत्रें इतर गांवीं उपयोगांत आणिलीं तर फायदा होईल. हल्लीच येवल्यास कारागीर लोकांस उपासमार होऊं लागली आहे, असें तेथील प्रसिद्ध व्यापारी नथुभाई श्यामलाल कळवितात.