पान:देशी हुन्नर.pdf/100

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ९४ ]

अंगावर फेंकितात. कलकत्ता प्रदर्शनांत एक शीख जातीचा लष्करी कामदार आला होता, तो असें सांगत असे कीं याच आमच्या हत्याराच्या योगानें पांचशें पावलावरून शत्रूचा शिरच्छेद करितां येतो.या कामदाराच्या डोक्यांवर पागोट्यांत गुंडाळलेलीं एका पेक्षां एक लहान अशीं पंचवीस चक्रें होतीं. दुरून त्याजकडे पाहिलें असतां त्याचें काळ्या रंगाचें पागोटें डोक्यावर सुमारें दीड हात उंचोच्या जटे सारखें दिसत होते.

 अलीकडे जिकडे तिकडे शांतता झाली आहे. त्यामुळें हत्यारांची गरज राहिली नाहीं व इंग्रेज सरकारानें कायदा काढून तीं वापरण्याची बंदीही केली आहे, त्यामुळें शोभेकरितां किंवा डोल मिरविण्याकरितां सुद्धां हत्यारें घेऊन फिरतां येत नाहीं. हा धंदा अगदीं बसला आहे. तथापि कच्छ, पालनपूर, जयपूर, बडोदें व इतर संस्थानांत हत्यारें होत असतात. त्यांत कच्छ येथील हत्यारें फार सुरेख असतात. म्हणजे त्यांजवर सोन्या रुप्याची नक्षी पुष्कळ केलेली असते. तलवारी व जंबिये इत्यादिकांच्या म्यानावर तांब्याचें पत्रें लावून त्याजवर सुरेख नक्षी केलेली असते. व वर सोन्याचा मुलामा चढविलेला असतो. त्यामुळें ती फार शोभिवंत दिसतात आणि तेवढ्याच साठीं पुष्कळ लोक आपल्या दिवाणखान्यांत शोभेकरितां लावण्याच्या हेतूनें विकत घेतात.

 जयपुरासही हत्यारें होतात परंतु ती कच्छ येथील हत्यारांसारखीं शोभिवंत नाहींत.

 जयपुरास तर ढाली कागदाच्या करूं लागले आहेत, उत्तम ढाली अमदाबादेस होतात. गेंड्याच्या एका ढालीवर सुरेख नक्षी खोदून ढालगर पुरुषोत्तम खुशाल यानें एक पुणे प्रदर्शनांत पाठविली आहे. ती ३६५ रुपयांस राजपुत्र ड्यूफ आफ कॉनाट यानीं विकत घेतली.

चाकु, कात्र्या वगैरे.

 चाकू, कात्र्या, विळ्या, आडकित्ते, इत्यादि जिनसा जिकडे तिकडे होतात. तरी हल्लीं असलीं हत्यारें विलायतेहूनच पुष्कळ येतात. पुणें प्रदर्शनांत सियालकोट, गुजराथ, व दिनापूर येथन चाकू कात्र्याचे नमूने आले आहेत. तसेंच अल्लीगड येथें पोस्ट खात्याच्या संबंधानें एक कारखाना काढिला आहे त्यांत तयार झालेलीं कांहीं लहान सहान हत्यारें आलीं आहेत. गोंडल संस्थानांतून आलेलीं