पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नवे... गाव नवं... माणसं नवी... मी परत एकटीच! माझं हे एकटेपण शक्ती होती... बळ होतं. संस्थेनं मला या एकटेपणाचं नवं भान दिलं. नवरा गेला तरी माहेरी जावं... सासरी जावं, असं वाटलं नाही. संस्थेनं माझ्यात मीपण जागवलं होतं. आता पाहा ना! मी पन्नाशीच्या उंबरठ्यावर एकटी आहे. मुलगा प्रशांत मोठा झालाय. विशी पार केलेला प्रशांत. त्याला परिस्थितीनं अकाली प्रौढ केलं. तो गारमेंटचा व्यवसाय करतो. त्याची सोयरीक त्यानंच जमवली. सून प्रिया बी.एस्सी झालेली गुणी मुलगी. प्रतिमा लवकरच ग्रॅज्युएट होईल. तिला उजवण्याची सर्व जय्यत तयारी. काळे गेले; पण मुलांसाठी चार पैसे ठेवून गेले. माहेरचा हिस्सा मी भांडून मिळविला. सोडला असता; पण त्यांनी मला वा-यावर सोडलं तेव्हा फाऽऽर सोसलं. असे भोग कुणासच येऊ नयेत. मला माझ्या मुलांना वा-यावर नव्हतं सोडायचं. संस्थेनं मला जर कोणतं बाळकडू दिलं असेल ते हेच! हात पसरायचे नाहीत. मिळवलं तरी माजायचं नाही. आपलं नसेल कोणी... दुस-याचं व्हायचं. बुडत्याला हात द्यायचा पण स्वतः बुडायचे नाही... डगमगणार नाही याची काळजी घ्यायची. मी ठरवून टाकलंय... पोरीचे हात पिवळे केले की, परत एकटं राहायचं! पोरांच्या संसारात ढवळाढवळ नाही करायची. संस्थेसारखं खंबीर पाठीमागे उभं राहायचं पण स्वतंत्र! संस्थेनं माझं असह्य जीवन सुसह्य केलं.. आज मी ऐकून आहे... सासर, माहेरचे माघारी म्हणत असतात पोरगी एकच राजर्षीसारखी राहतेवागते. मुलगी असूनही पोरासारखा पुरुषार्थ केला... न माघारी आली... न कधी हात पसरले... आली तरी सन्मानानं... नाकावर टिच्चून जगली... आमचंच चुकलं... आम्ही नाही तिला जोखलं... तिला अनाथ करायला नको होतं... आज आम्हीच अनाथ झालोय... पोरं एकटी. आम्ही एकटे... चुकलेल्याला पोटात घेण्यासारखं शहाणपण नाही. पण वाहून गेलेली नदी कुणाला कधी भरता आलीय?


दुःखहरण/९४