पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/88

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


नवा मुलगा, नवी मुलगी येत राहायचे. त्या साच्या चक्राची स्वतःची अशी गत होती. समाजाने दिलेली; पण समाजाला त्याचं थोडंही सोयरसुतक असायचे नाही. समाज विश्वामित्री पवित्रा घेऊन नेहमीच पाठ फिरवलेला निर्धास्त. इकडे मेनका, शकुंतला मात्र अपराधी, अपमानित, उपेक्षित, सुनील कोल्हापूरच्या अभिक्षणगृहात गेला. तरी इतर सांभाळलेल्या मुलांप्रमाणे येत-जात राहायचा. पत्रव्यवहार असायचा. ज्योत्स्नाची सारी स्वप्नं स्वप्नंच राहणार होती. सुनील एकच आशा होती. पै-पै जमवून त्याला शिक्षणाला मदत केली. लग्नही करून दिले. त्याच्या घरी येत-जात राहायचे. सून रेखा आश्रमातलीच मुलगी पण समजूतदार निघाली. पारणे, पांग फिटल्याचा आनंद मिळत होता.
 तशात एक दिवस आश्रमाने सांगितले की उद्यापासून तुम्हाला नोकरी करता येणार नाही. डॉक्टरांचं म्हणणं आहे की तुम्हाला कुष्ठरोग झालाय. मुलांना संसर्ग होईल. ज्या मुलांच्या आधारावर मी उभी पंचवीस-तीस वर्षे सर्व विसरून आयुष्य झोकून दिलं तो आधारच गेला. पायाखालची वाळू सरकू लागली. पायाखाली ना जमीन राहिली ना डोक्यावर आभाळ, भ्रमिष्ट झाले. वॉर्डाच्या कोप-यात जिन्याखाली माझी खाट घातली गेली. मी आजवर ज्यांच्यावर अधिकार गाजवला त्या आया-दाया पण मला हेटाळू लागल्या. अन्न गोड लागेना. तापाने फणफणले. बहुधा मी झुरून मरणार म्हणून अहिरराव (अधीक्षक) यांनी सुनीलला बोलावून घेतले. सुनीलने ज्योत्स्नासह मला कोल्हापूरला नेले; पण भाड्याच्या घरात ज्योत्स्नाला अशा वेडसर स्थितीत घेऊन राहणे शक्य होईना. पुन्हा आश्रमात आले. ज्योत्स्नाला आश्रमाच्या हवाली करण्याशिवाय पर्याय नव्हता. ज्योत्स्नाला आश्रमात सोडणे म्हणजे तिच्यावर पाणी सोडणेच होते नि तसे झालेही. ती काही दिवसांतच गेली.

 सुनील-रेखाने माझे सर्व केलं. औषधोपचार नियमित केले नि मी बरी झाले. मला कुष्ठरोग झाला नव्हता, असं डॉक्टरांचं म्हणणं. उपासतापास भरपूर करायचे. उष्णता वाढून कातडी काळी पडू लागली होती. औषधोपचार, सकस आहार, उपवास बंद करणे यामुळे मी पूर्ण बरी झाले. आज मी सुनीलच्या मालकीच्या घरात नव्हे, बंगल्यात अत्यंत ऐषारामात आहे. कुणालाही हेवा वाटावा, असे सुख मला लाभले आहे. ईश्वर नामस्मरण, वाचन, दूरदर्शन, नातवांशी गुजगोष्टी; सारं कसं अनपेक्षित पण सुखदायक्

दुःखहरण/८७