पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बाळंतपणापर्यंत झेपेल तितके काम करायची मुभा होती. बाळंतपणानंतर मात्र सांगेल ते काम करणे भाग पडायचे. जेवणे, राहणे फुकट असल्याने केलेल्या कामाचे पैसे मिळायचे नाहीत. शिवाय पोटच्या पोरीचा खर्चही आश्रम करायचा. मला मुलगी झाली. अंगावर दूध भरपूर होते. त्यावेळी ‘सुनील' नावाच्या मुलाची आई त्याला सोडून घरी निघून गेली होती. त्याला वरचं दूध पचेना. मला तर दूध भरपूर होतं. मेट्रननी सुनीलला मला पाजायला दिलं. त्याला दूध पचू लागलं. मी माझ्या मुलीबरोबर त्याला पण पाजू लागले. त्याला माझा व मला त्याचा कधी लळा लागला ते कळालेच नाही. मी माझ्या मुलीप्रमाणे... ज्योत्स्नाप्रमाणे त्याचा सांभाळ करू लागले. नंतर मला भाकरीच्या कामावर नेमले. सकाळ-संध्याकाळ शे-दोनशे भाकरी भाजाव्या लागायच्या. दोन रुपये महिन्याला मिळायचे. राम आठवायचा. दोन पोरं सांभाळत सारं करायला लागायचं. प्रायश्चित्तच होतं. मी निमूटपणे सहन करायची.
 माझे काम व स्वभाव पाहून मला पुढे मुलांचा सांभाळ करायचे दाईचे काम मिळाले. पुढे ते करत करत मी परिचारिका झाले. मुलांना औषध देणे, ताप घेणे, निरीक्षण करणे अशी सारी कामं करायला लागायची. बारा तासांचे काम. सुट्टी नसायची. पगार हळूहळू वाढत गेला.

 एक दिवस ज्योत्स्ना आंघोळ घालताना चक्कर आल्याचे निमित्त झाले नि तिचा एक पाय नि एक हात लुळापांगळा झाला. उपचार केले; पण यश आले नाही. डोक्यावर परिणाम झाला. पोटची पोर टाकायची कशी म्हणून तिचे सर्व करत राहिले. परिचारिका झाल्यावर मला राहायला स्वतंत्र खोली मिळाली. आणखी एक परिचारिका होत्या रमाबाई. त्यांची दोन मुलं नि माझी दोन. आम्ही दोघी व आमची मुले गुण्यागोविंदाने राहात असू. नोकरी करत असलो तरी आश्रमाचे सर्व नियम बंधनकारक होते. विचारल्याशिवाय बाहेर जायचे नाही. बघता-बघता मुलं मोठी झाली. मुलं मोठी झाली की त्यांची दुसरीकडे बदली करत. पोटच्या गोळ्याप्रमाणे वाढवलेल्या सुनील, विकास, रतन, अभय, अशोक यांना तोडताना जीव तुटायचा. रक्ताची सारी माणसं परागंदा झाली तेव्हा आश्रम माझं नवं घर झालं. नवी नातीगोती जमली. सारी मानलेली; पण घट्ट. कसली खोट नाही. मुली मोठ्या झाल्या, की आश्रम लग्न करून देत. स्नेहा, कुसुम, शुभांगी, लीला, चंचला किती तरी मुली सांभाळल्या. तुटलेलं नातं जोडायला

दुःखहरण/८६