पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शकुंतलेचे नशीब माझ्या कपाळी का आले?


 माझ्या आईचे नाव मनकर्णिका, वडिलांचे नाव सदाशिवशास्त्री. ती मूळची छिंदवाड्याची. पहाड्यांची मुलगी. लग्न होऊन पाटणसोंगीला आले. माझा जन्म नक्की कधी झाला मला माहीत नाही. माहीत आहे इतकंच की, मी अकरा महिन्यांची असताना आई वारली. पुढे वडिलांनी व घरातल्यांनी माझा सांभाळ केला. मी सात वर्षांची झाले असेन. वडिलांनी दुसरे लग्न केले. माझी सावत्र आई सरस्वती चिंचोली गावची. तिला दिवस जायचे; तिची मुलं जगायची नाहीत. एक मुलगा दोन वर्षांचा होऊन गेला. दुस-यांदाही मुलगा झाला. तो पाच दिवसांनी गेला. तिसरा सावत्र भाऊ 'बाबा' मात्र जगला. तो आजही अधूनमधून भेटत असतो.

वडिलांनी माझे अकराव्या वर्षी लग्न केले जैतापूरच्या महादेवराव कस्तुरेंशी. घरी नणंद होती. नणदेचा नवरा येत-जात असायचा. त्याने मला फसवले. सासरे कर्मठ. त्यांना हे पसंत पडले नाही. शिवाय माहेर जाणे शक्यच नव्हते. सास-यांनी माझी रवानगी पंढरपूरच्या बालकाश्रमात केली. मी पंढरपूरला आले तेव्हा चार-पाच महिन्यांची गरोदर होते. घरच्यांनी पैसे भरायचे नाकारले म्हणून मला ‘कामवाल्या बायकांत प्रवेश मिळला. (तिथे पैसे देणा-या, कमी देणाच्या, अधिक देणा-या, न देणा-या अशा वर्गाच्या बायका, कुमारी माता, परित्यक्ता इ. असायच्या.) पैसे देणान्यांना सर्व सोयी असायच्या; पण काम काहीच नसायचे. माझ्यासारख्या पैसे देऊ न शकणाच्यांना सोयी काहीच नसायच्या वर काम करायला लागायचे.

दुःखहरण/८५