पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कुटुंब उभारलं होतं. हे सारं अनाथ, अनौरस, परित्यक्ता, मतिमंद, प्रौढ अविवाहिता... कोण कुणाचं नव्हतं. त्यांच्या कुणालाच भूतकाळ नव्हता... नातीगोती, जात, नातलग काही नव्हतं, तरी ते एकमेकांचे भाऊ, बहीण, आई, मावशी, ताई झालेले होते.
 दुसरं कुटुंब सामंतांचं. लक्ष्मीबाईंनी देवीग्रस्त बेबी (प्रतिभा), श्रीकांत सामंतांशी विवाहित होऊनही स्वाती सामंत बनून शिक्षिका झालेली. पदरी संतोष, मेघा येऊन सुखी झालेला परिवार, संतोष अकाली निवर्तला, श्रीकांत सामंत अकाली नि अचानक विकलांग, रोगग्रस्त झाल्यानं त्यांना त्यांच्या रक्ताच्या नातेवाइकांनी वाळीत टाकलं होतं. सख्खा भाऊ शेजारी; पण अपरिचितासारखा राहायचा. तेव्हा विठ्ठल, बिपिन हे मानलेले भाऊच पाठीमागे उभं राहायचे.
 विद्याताई, रघुनाथ, भूषण आजी, मामाचं तिसरं कुटुंब उच्चभ्रू; पण दिवस फिरल्यानं दुर्दशेत सापडलेलं. अपंगत्व येणं, निराधार होणं, गरिबी हे असं वारं असतं की, ते तुम्हाला होत्याचं नव्हतं करतं. तुमच्या हातात असतात भूतकाळाच्या श्रीमंत स्मृती व वर्तमानाचे चटके! ते एकाच वेळी तुम्हास स्मरणरंजनात गुंग करत राहतात... कधी भूतकाळाचं तर कधी भविष्याचं; पण त्यात वर्तमान हातातून निसटून जातो. हाती लागते फक्त संस्था अन् तिथंच फक्त शिल्लक असलेली माणसं... अन् त्यांची माणुसकी!
 मी संस्था नि मनुष्य संबंधाचा गोफ गुंफत उसवलेली आयुष्य शिवत राहतो. तो उपकाराचा उद्योग नसतो. तो असतो एक खटाटोप. आपणच आपल्या गुजरलेल्या आयुष्याचा तो असतो एक पुनर्णोध! ते काम एखाद्या कुशल खलाशासारखं करावं लागतं. एकाच वेळी अष्टावधानं सांभाळायची... वाच्यावर स्वार व्हायचं... नावेचं नियंत्रण... दिशा निश्चिती... अन् प्रवास तर सुरूच! लाटा, वादळे, खडक सारं असतं अन् त्याचं भविष्यलक्ष्यी भान ठेवत पुढे जायचं असतं. हे सोपं नसतं. ही कथा जितक्या संक्षिप्तपणानं लिहिली तितकी माझं नि त्या सर्वांचं हे गतायुष्य इतकं सुबोध, सरळ मुळीच नव्हतं!

 आज तीस वर्षांनी मागे वळून पाहताना... ‘शेवट गोड ते सारं गोड वाटलं तरी प्रवासातले खाचखळगे आठवतात, तेव्हा आज वातानुकूलित घरातही अंग शहारतं! लक्षात येतं, उसवलेल्या आयुष्यांना टाके घालणं म्हणजे रोज नव्या संकटांना सामोरं जाणं असतं... आनंद एकाच गोष्टीचा असतो... उद्याचं जग आपलं होणार असतं...

दुःखहरण/८४