पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उसवलेली आयुष्य सावरताना...


 निराळं जग, उद्ध्वस्त कुटुंब नि त्यातील माणसांचं असतं. या जगात विस्कटलेली आयुष्य सावरणं नि ती स्थिरावणं एक आव्हान असतं. मी कोल्हापूर रिमांड होमचं बालकल्याण संकुलात रूपांतर करत असतानाच्या काळात तेथील लाभार्थी व त्यांचे प्रश्न सोडवायचे म्हणून गरजेतून एका मागून एक संस्था स्थापन केल्या.
 अर्भकालय, बालकाश्रम, आधारगृह, अनुरक्षण गृह... या नि अशा इतर काही संस्था स्थापन करताना एकच विचार त्यांच्या पाठीशी होता की, समाजातल्या प्रत्येक वंचिताला आधार, संरक्षण देऊन त्यांच्या विस्कटलेल्या आयुष्याची घडी बसवायची, त्यांचे समाजात सुस्थापन करायचं.
 या काळात मला आठवतं की, एकदा नेहमीप्रमाणे संकुलात शनिवारी बालन्यायालय भरलं होतं. संस्था प्रतिनिधी म्हणून न्यायाधीश, परिविक्षा अधिकारी यांच्याशी मुला-मुलींच्या काही न्यायप्रविष्ट प्रकरणांबाबत चर्चा करत होतो. तेवढ्यात एक आजी आपली मुलगी व नातवाला घेऊन आल्या. डोळ्यांत पाणी काढून विनवत होत्या... नातू गुणाचा आहे. लेक अपंग आहे खरी; पण कपाळ फाटलं, तिचं काही करा. त्यांना आसरा द्या. मला निभवलं तोवर मी सांभाळलं. आता माझ्याच्यानं निभवंना. काही पण करा... दोघा लेकरांना सांभाळा."

 आजींनी त्या दिवशी सांगितलेली कहाणी हृदयस्पर्शी होती, तशीच विलक्षणही! त्यांची मुलगी विद्या जन्मतः एका हाताने अधू होती. लुळी

दुःखहरण/८०