पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बसायचे... एकदा तर मी त्यांच्यावर उपचार करणा-या सायकॅट्रिस्टकडे पेशंट म्हणून स्वतःच गेले तर ते लागले हसायला... सज्जन गृहस्थ होते... म्हणाले, “वहिनी, तुम्हाला विकार नाही, ताण आहे. तुम्ही फार विचार करता. तुम्ही एकट्या नाही. माणसं जोडा, जोडत राहा... जग बदललेलं दिसेल. तुम्हाला एक सांगतो, जगाची फार काळजी, विचार करू नका. आपण एकविसाव्या शतकात जगतो आहोत... इथं काही लागत नाही... मन खंबीर लागतं... ‘जलनेवाले तेरा मुँह काला' म्हणा नि जगा... फिकीर करू नका कुणाची... कोण रोज तुम्हाला वाढायला येत नाही... आपणच । शिजवायचं नि खायचं, दुसरा काय म्हणतो कशाला विचार करता? दुनिया गयी भाड़ में. अपना हाथ जगन्नाथ!"

 मी घरी सूर्य घेऊनच परतले... एकटीच होते सोबतीला, आता दृष्टी होती... रोजचं मरणं मला जगणं वाटू लागलं... मी रोज एकटेपणाच्या ज्वालामुखीवरच बसलेली असायचे... पण इतक्या सामाजिक त्सुनामी अनुभवल्या होत्या... भूकंप, पूर, हादरे कशानेच हादरायचं नाही असं आता माझं मीच ठरवल्यामुळे ज्योती वयात येताच तिला स्वयंवराचा मंत्र देऊन रिकामी झाले. आज नातू आहे, जावई आहे, हे आहेत... पण आता मला जगण्यात स्वारस्यच उरलं नाही... इच्छामरण स्वीकारायचं असं मी अरुणा शानबागच्या निकालादिवशीच ठरवलं... आहार कमी घेते... कमी करत निघाले आहे... औषध सोडलं आहे... जगच सोडायचं तर माणसानं निरिच्छ व्हावं.. नाही तर माणूस एकटाच असतो ना? अकेला आता है, जाता है भी एकेला! अकला चलो रे!

दुःखहरण/७९