पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे; तर दुस-या बाजूला एका सीमित वर्गाच्या दृष्टीने तो दयाबुद्धीचा व कोरड्या सहानुभूतीचा राहिला आहे.
 ‘दुःखहरण' या संग्रहातील कथांत विविध त-हेच्या पीडित व्यक्तिरेखा आहेत. ज्यांचा भूतकाळ काळोखमय होता आणि वर्तमान अडथळ्याचा आहे. मात्र त्यांची भविष्याकडे जाण्याची सकारात्मक धडपड चालू आहे अशा माणसांच्या या कथा आहेत. वंचित जगातील अनेक प्रकारची माणसे या लेखांचे चित्रणविषय आहेत. क्षणांत चूक घडलेली व गुन्हेगार समजले जाणारे, अपंग, परित्यक्ता, कुमारी माता, शिक्षा भोगणारे, बालसंकुलात निरीक्षणाखाली ठेवलेल्या अनेक व्यक्तींचे जीवनपट या लेखांत आहेत. लहान मुलांपासून स्त्री-पुरुषांपर्यंतचे जग या लेखनात आहे. छिंदवाडा-गोव्यापासून महाराष्ट्रातील विविध भागातील स्त्रीपुरुष या लेखनात आहे. सर्वसामान्यांच्या जीवनकक्षेच्या बाहेरचे अनुभवविश्व यामध्ये आहे. वाचताक्षणी डोके सुन्न व्हावे. आपल्या आवतीभोवती इतके भयावह वास्तव आहे याची दखलही आपल्याला नसते. अशा जगाचे भेदक असे दर्शन या लेखनात आहे. यातील एकेकाचे आयुष्य हे कल्पनेपलीकडचे आहे. हादरवून टाकणाच्या जगाचे हे अंतर्भेदी दर्शन आहे.
 व्यक्तींच्या परिस्थितीशरणतेची मीमांसाही या लेखनात आहे. या व्यक्तीच्या आयुष्यात आलेल्या विपरीत प्रसंगांची सर्वांगीण चिकित्साही आहे. समाजाच्या पराकोटीच्या नैतिकतेच्या विशिष्ट आग्रहापोटी, चुकीच्या गृहितकांमुळे व समाजभयाच्या अदृश्य सावटाखाली गुदमरणाच्या जिवांचा झगडा या चित्रणात आहे.
 सुनीलकुमार लवटे यांच्या लेखांतील चित्रणविषयाचा लक्षणीय विशेष म्हणजे, ते ज्या वंचित समूहाचे जग चितारतात ते सर्वस्वी अभावाचे, दुःखाचे, अनिश्चिततेचे जग आहे. या माणसांचे जीवनचक्र पराकोटीच्या दुःखचक्राला बांधलेले आहे. दारिद्रय, अनाथपण, वंचना त्यांच्या वाट्याला आलेली आहे. या माणसांच्या जगण्यातील केवळ दुःखाचे, अन्यायाचे करुणेचे ते केवळ चित्रण करीत नाहीत. ही माणसे मोडून पडत नाहीत, सदैव जगण्याला दोन हात करतात. पुन्हा नव्याने आयुष्य उभं करतात. जीवन जगण्याची अदम्य विजीगीषू वृत्ती त्यांच्यात आहे. जीवनावरच्या या आस्थेपोटीच ते अभावाच्या जगाला समांतर पर्याय शोधतात आणि वाटचाल करतात. नैराश्य, उदासीनता, विमनस्कतेच्या गर्तेतून पुन्हा नव्याने जगण्याला कवटाळतात आणि आनंदाने स्वतःच्या जीवनविषयक दृष्टीने