पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आता मी माझी होते... आगा ना पिछा... फक्त जगणं हा एकच मार्ग... अन् एका रात्री कळलं की, यांना इच्छाच होत नाही... डॉक्टरांना भेटले... उपचार झाले... दोन वर्ष प्रयत्न झाले... ते रोज पाठ फिरवून झोपून जायचे...
 रोजचा त्यांचा दिनक्रम ठरलेला... उठणं... आवरणं... पेपर वाचणं.. नाश्ता करणं.... बसनं फॅक्टरीत जाणं... ठरलेल्या वेळी घरी येणं... सिनेमा... हॉटेल... समुद्र... फिरणं सगळं यथाक्रम बेमालूम पार पडायचं... रात्र सरता सरायची नाही. अन् एक दिवस ते कधी नाही ते नोकरीवर जाणार नाही म्हणून बसले... खोलीत कडी लावून बसायचे... पेपरवर काहीबाही लिहीत राहायचे... मग मीच पुढाकार घेऊन एक दिवस युनियनच्या मध्यस्थीनं कामावर नेलं... ते साहेब होते.... शिफ्ट इन्चार्ज... सगळे मानायचे... पण लहरी स्वभाव म्हणे! महिनाभर असाच गेला... मी गाडी मूळ पदावर आली म्हणून खूश होते... खुशीत मी नोकरीची परवानगी मिळविली... सुदैवानं मला महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात लेक्चरची नोकरी मिळाली... रात्रीचा प्रॉब्लेम होता... पण दिवस तरी चांगला जाऊ लागला... नाही तर सोसायटीत बायकांचं ऐकून घ्यायला लागायचं... 'एवढी डॉक्टरेट... माशा मारते...'

 सहा महिने बरे गेलेले प्रभूला पाहवले नसावे... फॅक्टरीच्या गाडीतून त्यांना काही लोकांनी दुपारी घरी आणून सोडलं... मॅनेजरांचा फोन आला... फोन करायला सांगितला... संध्याकाळी सासूबाईंनी भांडीवाली आली नाहीच्या सहजतेनं फॅक्टरीचा निरोप दिला.. मी भीतभीतच फोन केला... आणि काय वाढून ठेवलंय म्हणून... एव्हाना मला आता रोज काही तरी अघटित, अनपेक्षित घडणार हे अंगवळणीच पडून गेलेलं... मीठ नाही म्हणून सास-यांचं ताटावरून उठणं.. वन्संना फोन केला नाही म्हणून सासूचा अबोला... गणपतीला दिरांच्या घरी नैवेद्य पाठवला नाही म्हणून नणंदा, दिरांचा अघोषित बहिष्कार... या सा-यांतून रोज वाट काढण्यापेक्षा समुद्रात उडी टाकून जीव द्यावा वाटायचं. दुस-या दिवशी कॉलेजला जाण्यापूर्वी फोन केला मॅनेजरांना... 'मॅडम, मी जे सांगतो ते तुम्ही धीरानं ऐकून घ्या... आमची सहानुभूती आहे; पण इलाज नाही... यापूर्वी आम्ही छोट्या मोठ्या चुकांकडे दुर्लक्ष केलं.. पण काल त्यांनी सगळा प्लॅन्टच शटडाऊन करून टाकला... एक कोटीचा फटका बसला... साहेबांना काही परत फॅक्टरीकडे पाठवू नका... लीगल अॅक्शन होईल... कॉम्पेनसेशन

दुःखहरण/७६