पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मॅडमनी सोडलं त्यांना... इतकं सगळं ऐकून कोण ‘आ बैल मुझे मार' म्हणणार?
 पण सिस्टरांचा धोशा... “मी आश्रम सोडून आता धर्मप्रसाराला वाहून घेणार आहे... भारतभर मला भटकावं लागणार. तुझं लग्न झालं की मी सुटले... हे प्रभू येशू... या लेकराला तेवढं सुखी कर... तू सगळ्यांचा पालक ना रे?..." इंग्रजी पेपरातल्या वधूवर सूचक जाहिराती पाहणं, लिहिणं, संपर्क साधणं हाच सिस्टरांचा नि माझा उद्योग होऊन गेलेला... अन् लग्न एकदाचं ठरलं... मी तिशीत... ते पस्तिशीचे इंजिनिअर... स्वतःचा फ्लॅट, नोकरी. सासू-सासरेच घरी, मुली साध्या सासरी गेलेल्या, नोकरी करायची परवानगी. मुलगा अबोल, फक्त निरागस हसायचा. लग्नाआधी आम्हाला बोलायला दिलं होतं... हॉटेलात गेलो, समुद्रावर फिरून आलो... मीच बोलत होते... तो ‘हां... हो... चालेल... हरकत नाही...' तिसरा शब्द नाही... एवढं सोडता नाकारण्यासारखं काहीच नव्हतं. हो म्हटलं नि झालं... आश्रमात नाही, बाहेर कार्यालयात लग्न करायचा आग्रह होता तिकडच्यांचा. तो आश्रमाच्या फादरनी अपवाद करून मान्य केला... प्रभूला काळजी म्हणून!

 कितीतरी स्वप्नं घेऊन मी सासरी आले... सासरे निवृत्त ऑडिटर... मोठे खाष्ट. सासू पुढे काही बोलायची नाही... मागे काड्या घालायची... मटण-मासे मला आवडायचे नाही; पण सासर सुखी तर आपण सुखी म्हणून शंभर गोष्टी स्वीकारत गेले... सिस्टरने लग्न झाल्यावर मला निरोप देताना डोळ्यांत पाणी आणून निर्वाणीचं सांगितलं होतं, तुझी आई फसून आली होती... तिला मोकळं करायचं होतं... आश्रम सोडताना मी तिला प्रभू येशूची शपथ घेऊन सांगितलं होतं. प्रभू, प्रसाद म्हणून सांभाळीन; पण लग्नापर्यंतच. नंतर ती तिची प्रभू! त्यांनी तो शब्द पाळला नि परागंदा झाल्या. त्यांनी आश्रम सोडला होता धर्मप्रसारार्थ... त्या कुठे गेल्या कुणालाच माहीत नाही... एकदा एका ननने सांगितलं की, त्या तुझ्या आईसारख्याच आल्या होत्या... पण परत घरी न जायच्या अटीवर... त्यांना घर होतं का? नातेवाईक? कुणालाच माहीत नाही... आल्या तेव्हा फादरना म्हणाल्या होत्या, मी प्रभूच्या चरणी 'शरण' म्हणून आले आहे... ईश्वराच्या लीला भरपूर पाहिल्या... ऐकलं होतं... प्रभू निराधारांचा सांभाळ करतो... मी कोण विचारू नका... मला सांभाळा... मी कळपातलं एक लेकरू सांभाळीन... प्रायश्चित्त म्हणा किंवा उतराई.

दुःखहरण/७५